प्रतिनिधी/ रत्नागिरी
आवड आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याच इच्छा शक्तीला भक्तीची जोड असेल तर कोणत्याही अडथळ्याविना उद्देश साध्य होतोच. असाच श्रद्धा आणि इच्छा शक्तीचा संगम रत्नागिरीतील मिरजोळे पाडावेवाडीतील दोन बालकांमध्ये पहावयास मिळाला. कोणत्याही साच्याचा वापर न करता या दोघा बंधूंनी हस्तकौशल्यातून गणेश मूर्ती बनवल्या आहेत.
गणपतीचा बेस कसा तयार करायचा? त्याचे शरीर, कान, सोंड कशी तयार करायची? मुकुट, हातातले मोदक, लाडू कसे बनवायचे? याची प्रतिमा अगोदर मनात आकार घ्यावी लागते. मऊशार शाडू मातीचा गोळा हातात आला मूर्तीला आकार फुटतात. रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे पाडावेवाडी येथे राहणारे प्रतिक महेंद्र पाडावे (15) व रोहन संतोष पाडावे (13) यांनी गणेशाच्या विविध आकारातील मूर्ती घडवून दाखवून दिले आहे. बालदशेत शाडूच्या मातीला आकार देतादेता दोघांनीही गणपतीची विविध रुपे मूर्तीरुपात साकारण्याचा चंग मनात बांधला आहे. एक कलेची आवड व बाप्पावरील श्रध्दा यांतूनच या दोघांनी कोणत्याही प्रकारच्या साच्याचा वापर न करता व कोणाचीही मदत न घेता अत्यंत कलाकुसरीने सुंदर मूर्ती घडवल्या आहेत.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून गणेशोत्सव जवळ आला की हे दोघे शाडूपासून गणराया तयार करण्याच्या छंदात व्यस्त होतात. शाडूपासून अगदी 6 इंचापासून फुटभर उंचीपर्यंतच्या मूर्ती या दोघांनी घडवल्या आहेत. प्रतिवर्षी एक दोन मूर्तीं तयार करण्यावर या दोघांचा भर राहतो. यावर्षी दोघांनीही 3-3 गणेशाच्या मूर्ती साकारल्या आहेत. सिंहासनावर आसनस्थ गणपती, माखन खाणारा बाप्पा, हंसधारी गणपती, ढोलवादक गणपती अशी ना-ना रुपे या दोघांनी मूर्तीच्या रुपातून साकारली आहेत. मूर्ती घडविल्यानंतर त्यांना आकर्षक रंगकाम करून सुबक रुपही देण्याचा त्यांचा हातखंडा अचंबित करणार आहे.
एरव्ही मुलांचे हात मातीने बरबटले, कपडे, चेहऱयाला, हाताला माती लागली तर वडीलधारे ओरडतात. पण यांचे मूर्ताकाम पाहून कुणीच रागावत नाही व ओरडतही नाहीत. उलट त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन घरातून मिळत असल्याने या दोघांनी कलेला चांगलीच उभारी देण्याचा प्रयास चालवला आहे. गणरायाविषयी असलेली त्या दोघांची आवड पाहून मूर्ती कौशल्याला अनेकांनी दाद दिली. त्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रचिती गणेशोत्सवात घरी येणाऱयांना मिळते.
चौकट…
मूर्तीकलेबरोबर अभ्यास व खेळातही ठसा
प्रतिक व रोहन हे दोघेही सख्खेचुलत बंधू आहेत. शहरातील रा.भा.शिर्के प्रशालेचे विद्यार्थी आहेत. प्रतिक हा 10 वी इयत्तेत तर रोहन हा 8 वी मध्ये आहे. रोहन यांने शहरात मुलांसाठी घेण्यात आलेल्या मूर्तिकला स्पर्धा 2017 व 2018 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. रोहन एलिमेंटरी परीक्षा ब ग्रेड ने उत्तीर्ण झाला आहे.
तर प्रतीक मूर्तिकला स्पर्धा 2017 व 2019 प्रथम 2018 द्वितीय आला होता. अभ्यासातही दोघेही निपूण तर कबड्डी खेळाची आवड असून शालेय संघात या दोघांचा नेहमीच सहभाग राहतो.