ऑनलाईन टीम / नवी लखनऊ :
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश एस. के. यादव यांच्या सीबीआय न्यायालयात ही सुनावणी झाली.
अयोध्येत 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, साध्वी रिटब्रा, राज्यसभेचे माजी खासदार विनय कटियार यांच्यासह एकूण 49 जणांचा या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये समावेश आहे. त्यामधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
या सर्व आरोपींनी मशीद पाडण्यासाठी कारस्थान रचले. तसेच कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली, असा सीबीआयचा युक्तिवाद होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती.
आयपीसीच्या कलम 153 अ, 153 ब, 505, 147 आणि 149 अंतर्गत हे प्रकरण रायबरेलीकडे गेले होते. त्यानंतर लखनऊ सीबीआय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता.