इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2020-21 या नव्या वर्षासाठी 18 सदस्यीय राष्ट्रीय कराराची यादी जाहीर केली. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहसह इफ्तिखार अहमद या दोन नव्या चेहऱयांना यादीत स्थान देण्यात आले आहे. तसेच अजहर अली हा कसोटी तर वनडे, टी-20 क्रिकेटसाठी बाबर आझम कर्णधार असणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष मिसबाह उल हक यांनी जाहीर केले. हा करार 1 जुलैपासून लागू होईल.
माजी कर्णधार सरफराज अहमदला ब श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
आगामी काळात सरफराजचा अनुभव पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मिसबाहने व्यक्त केला. तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये उच्च कामगिरी करणाऱया युवा क्रिकेटपटूंना पुरस्कृत करण्याचा भाग म्हणून पीसीबीने एक नवीन इमर्जिंग प्लेयर्स श्रेणी देखील तयार केली आहे, यामध्ये हैदर अली आणि वेगवान गोलंदाज हरीस रौफ, मोहम्मद हसनन यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती मिसबाहने दिली.