मुंबईत अडकलेल्या गोव्यातील ज्येष्ठ दांपत्याची हाक : दोघेही प्रचंड तणावाखाली : पती आजारी पडल्याने इस्पितळात उपचार
प्रतिनिधी / पणजी
बाबानो, मला एकदाचे गोव्यात घेऊन चला. गोव्यात घेऊन गेला नाहीत तर मी रस्त्यावर पडणार. काही करा, मला माझ्या गोव्यात घेऊन चला, असे निवेदन करून जोरजोरात हुंदके देऊन रडणारी ही महिला म्हणजेच अँजेलिना शालू फर्नांडिस. गेले पावणेदोन महिने लॉकडॉनमुळे ती मुंबईत अडकून पडलीय.
तिच्याकडे नातेवाईकांचे फोन नंबर नाहीत. तिची मुलगी चांदोर येथे गेल्या वर्षीच लग्न होऊन गेलेली. तिचा नवरा बोटीवर. तो देखील सध्या अडचणीत सापडलेला आहे. मुलीने आपल्या परिने प्रयत्न केले. परंतु कोणीच या आपल्या आईवडिलांना मुंबईहून गोव्यात आणण्यास मदत करू शकत नाही.
अँजेलिनाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत. ती आपल्या पतीला शालू फर्नांडिस यांना घेऊन मुंबईत एका दूरच्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती एका मैत्रिणीकडे गेली. तिथे अँजेलिनाचा नवरा आजारी पडला. त्याची साखर वाढत गेली. अखेर त्याला इस्पितळात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार चालू आहेत.
कोणीही मदत करण्यास तयार नाही
मुंबईत पोहोचल्यानंतर लॉकडाऊन कालावधी जाहीर झाला. त्यामुळे तिला घरातून बाहेर पडता येईना. गेले दीड महिना ती गोव्यात परत येण्यासाठी अक्षरशः संघर्ष करीत आहे. तिच्याकडे असलेले पैसे संपले. कोणीतरी थोडीफार मदत केली. त्यातून नवऱयाच्या आरोग्यावर खर्च झाला. आता तिला गोव्यात येण्यासाठी अक्षशः धडपडावे लागतेय. परंतु कोणीही मदत करण्यास तयार नाही. येणाऱया प्रत्येकाला ही महिला आम्हाला गोव्यात जाण्यासाठी सहकार्य करा, अशी हात जोडून विनंती करतेय. तिने एक दोन फादर्सना फोन करून सांगितले. त्यांनी केवळ सहानुभूती दर्शविली. परंतु कोणतीही मदत केली नाही.
शालू व अँजेलिना मूळ काले येथील
शालू व त्याची पत्नी अँजेलिना दोघेही तसे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे मूळ घर काले धारबांदोडा तालुका येथे आहे. आता गोव्यात येण्यासाठी कोणाच्या पाया पडायचे हे कळत नाही. मुंबईत मंत्रालयात काम करणारे कर्मचारी सुनील नाईक यांचा फोन नंबर त्यांना मिळाला. त्यांना ही कर्मकहाणी तिथे कथन केली. सुनील नाईक यांनी पणजीत दैनिक तरुण भारतशी संपर्क साधला. या माहिलेवर कृपा करा अशी विनंती केली.
बाबा, आमका गोयांत व्हरा…
या प्रतिनिधीने अँजेलिनाशी संपर्क साधला असता त्या जोरजोरात रडल्या. बाबा आमका गोयांत व्हरा. दोन दिवसांत शालूला इस्पितळातून डिस्चार्च देतील. मग मी काय करू? माझा इथे मुंबईत कोणीही नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. मी मुंबईत कुठे राहू, मला इस्पितळातून नवऱयाला घेऊन दोन दिवसांत बाहेर पडावे लागेल. तेव्हा मला गोव्यात घेऊन चला. मोठे उपकार होतील, असे निवेदन करून त्या ओक्साबोकशी रडू लागल्या.
बेळगाव अलिकडे अडकलेल्या एका ज्येष्ठ गोमंतकीय नागरिकाला गोवा सरकारने विशेषतः उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील मामलेदार प्रवीण गावस यांनी पुढाकार घेऊन गोव्यात आणले. आता या अँजेलिना व शालू या दोघांना गोव्यात आणण्यासाठी व्यवस्था कोण करणार? बिचारे गेले पावणेदोन महिने मुंबईत संघर्ष करीत आहेत. डोक्यावर ताण वाढल्याबरोबर शालूची साखरही वाढली व मधूमेहाने जर्जर झालेल्या शालू व अँजेलिना या दोघांची मनसिकता बरोबर नाही. दोघेही प्रचंड तणावाखाली आहेत. कालेच्या या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना कोणी मदत करील का? याची ती वाट पाहत आहेत.