पुणे \ ऑनलाईन टीम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी ते भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे ते राज्यपाल कोश्यारींसह दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज 13 ऑगस्टला बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत शिवशाहीरांचे अभीष्टचिंतन करणार आहेत. सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येईल.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तारखेप्रमाणे 29 जुलैला शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला.