- आजोबांच्या चेहऱ्यावर हसू; अनेक दिग्गजांनी केली मदत
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यामध्ये बाबा का ढाबा नावाच्या दुकानातील आजोबांचा स्टॉल आहे. आजी आजोबांनी मटर पनीर, भात डाळ असं जेवण या स्टॉलवर बनवले आहे. पण कोरोना काळात कोणी इथे फिरकत नाही. यामुळे भावूक झालेले आजोबा रडताना दिसत होते. पण हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर आता बाबाचा ढाबावर एकच गर्दी पाहायला मिळाली.
बाबाचा ढाबावर मटर पनीर खाण्यासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली आहे. @VasundharaTankh नावाच्या यूजरने बुधवारी संध्याकाळी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. ट्वीटरवर आतापर्यंत 2.3 मिलियनवेळा हा व्हिडीओ पाहीला गेला आहे.
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये कांता प्रसाद आणि बादामी देवी अनेक वर्षांपासून बाबा का ढाबा चालवत आहेत. दोघांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे पण त्यांना कोणी मदत करत नाही. सर्व काम त्यांना स्वत:च करावी लागतात.
दरम्यान, हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज मदतील धावून आले. अभिनेत्री रविना टंडननेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर करत चाहत्यांनाही ‘बाबा का ढाबा’ला एकदा तरी भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच जो कोणी येथे जेवेल त्याने त्याचा ‘बाबा का ढाबा’ सह एक फोटो काढून रवीनाला पाठवायचा आहे. पुढे तो फोटो ती सोशल मीडियावर शेअर करणार असून त्याचसोबत तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवणार असल्याचे रविनाने म्हटले आहे.
अभिनेत्री रविना टंडनसह सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी मदतीसाठी आले आहेत. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सने ट्विटवर व्हिडीओ शेअर करत बाबा का ढाबावर जाण्याचे आवाहन केले.
@VasundharaTankh या यूजरने आज दिवसभरात ढाबावर झालेली गर्दी पाहून त्याने आज पुन्हा समधान व्यक्त केले आहे.