उपराज्यपाल मुर्मू यांनी केली पूजा : प्रतिदिन 500 भाविकांना मंजुरी मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था / जम्मू
अमरनाथ येथील बाबा बर्फानीच्या विशेष पूजेचे पहिल्यांदाच थेट प्रसारण रविवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू झाले आहे. हे प्रसारण 3 ऑगस्टपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रसारणासाठी दूरदर्शनच्या 15 कर्मचाऱयांचे पथक गुहा परिसरात राहणार आहे. रविवारच्या विशेष पूजेत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू, जीओसी चिनार कॉर्प्ससह अनेक अधिकारी सामील झाले आहेत.
मागील वर्षी 2 ऑगस्ट रोजी यात्रामार्गात स्फोटके आढळून आल्यावर यात्रा रोखण्यात आली होती. तत्पूर्वी 3.42 लाख लोकांनी अमरनाथ येथील हिमलिंगाचे दर्शन घेतले होते. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष आणि उपराज्यपाल मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या स्वरुपावर पुढील काही दिवसांतच निर्णय होऊ शकतो. यंदा यात्रेवर अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. यात्रेला अनुमती मिळाल्यास ती बालटालमार्गेच होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पहलगामच्या पारंपरिक मार्गाने यात्रा होणार नाही. बालटालच्या मार्गाद्वारे भाविकांना एक ते दोन दिवसात दर्शन करून परतता येते. दरदिनी अमरनाथ गुहेपर्यंत केवळ 500 भाविकांनाच जाण्याची अनुमती मिळणार आहे. बालटाल मार्गात चार हेलिपॅड आणि शिबिरांची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा हेलिकॉप्टरद्वारे यात्रा घडविली जाण्याची शक्यता आहे.
15 दिवसांची यात्रा शक्य
अमरनाथ गुहा 3,880 फुटांच्या उंचीवर असून तेथे दर वर्षी अनंतनागच्या पहलगाम आणि गांदेरबलच्या बालटालमार्गे यात्रा सुरू होते आणि ती 42 दिवसांपर्यंत चालते. यंदा यात्रा 23 जूनपासून सुरू होणार होती, परंतु कोरोना संकटामुळे यात्रेला विलंब झाला आहे. अमरनाथ श्राइन बोर्ड जुलैच्या अखेरीस 15 दिवसांसाठी यात्रेचे नियोजन करू पाहत आहे.
कोरोना चाचणी होणार
मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम हे यात्रेच्या स्वरुपावर काम करत आहेत. त्यांनी पर्यायी मार्ग नीलग्रथपासून बालटालमध्ये सुरू असलेल्या कार्यांचा आढावा घेतला आहे. सद्यस्थिती पाहता यात्रेवर कठोर नियम लागू होणार आहेत. कोरोना संकट वाढल्याने केंद्रशासित प्रदेशात येणाऱया प्रत्येक व्यक्तीची चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत संबंधित व्यक्तीला विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे.