नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
अॅलोपॅथी डॉक्टर व अॅलोपॅथी उपचारपद्धती यावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरू बाबा रामदेव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याचा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता. त्यावर बोलताना बाबा रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही, अस वक्तव्य केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करत योगगुरू बाबा रामदेव यांना उत्तर दिले आहे. सध्या त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत, असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्ला चढवला आहे. या ट्विटमधून महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता टीका केली आहे.
बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानांचा निषेध करत आयएमएने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच बाबा रामदेव यांनी१५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी नोटीस देखील आयएमएने बजावली आहे.