ऍड.आयरीश रॉड्रिग्ज यांची मागणी, हल्ला होण्याची भीती
प्रतिनिधी /पणजी
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांकडून आपल्यावर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे हा हल्ला रोखण्यासाठी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यावा व आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
ऍड. आयरीश यांनी आपल्या तक्रारीची प्रत पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांच्याकडे सादर केली आहे. आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
यापूर्वी दि. 13 ऑक्टोबर 2008 रोजी आयरीश यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी दोन बोटांना मार लागला होता. बाबू मोन्सेरात व त्यांचा मुलगा विद्यमान पणजीचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार त्यावेळी त्यांनी लावून धरली होती. सदर हल्ला प्रकरणी गुन्हा नोंद झाला. न्यायालयात आरोपपत्रही सादर झाले. प्रकरण आपसात मिटले व संशयित आरोपी दोषमुक्त झाले.
पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी सत्र न्यायालयात सादर झालेल्या आरोपपत्रावरील सुनावणीस स्थगिती मिळाल्यास 7 वर्षे झाली. सदर स्थगिती उठवून सत्र न्यायालयातील सुनावणी चालू ठेवावी, अशी मागणी ऍड. आयरीश यांनी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले होते. दि. 22 डिसेंबर 2021 रोजी उच्च न्यायालयाने निवाडा देताना स्थगिती उठवून सुनावणी सुरू करण्याचा आदेश दिला.
या घटनाक्रमामुळे आपल्यावर नव्याने हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुन्हा नोंदवून पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.