प्रतिनिधी /बेळगाव
बसवण गल्ली, शहापूर येथील हुतात्मा बाबू काकेरू चौक येथे बेळगावच्या स्वातंत्र्यलढय़ातील एकमेव हुतात्मा बाबू काकेरू यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी ऍड. मोहन सप्रे होते.
प्रारंभी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या प्रास्ताविकानंतर ऍड. मोहन सप्रे व शिवनेरी युवक मंडळाचे नेते व अध्यक्ष विजय उंडाळे यांच्या हस्ते हुतात्मा काकेरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर जायंट्स ग्रुप (मेन), जायंट्स सखी महिला मंडळ, सिद्धार्थ फ्री बोर्डिंग, प्रा. भरमाजी कोलेकर, शिवनेरी युवक मंडळ, बाबू काकेरू चौक सुधारणा मंडळ, महाराष्ट्र एकीकरण समिती व विकास कार्यातील नेते मदन बामणे व जायंट्सचे विद्यमान अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
यावेळी मराठा जागृती संघाचे संस्थापक व अध्यक्ष गोपाळराव बिर्जे, बेळगावच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, नेताजी जाधव, हिरालालजी चव्हाण, संतोष होंगल, मदन बामणे यांच्या समयोचित व स्फूर्तिदायक भाषणांनंतर ऍड. मोहन सप्रे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाच्या संयोजिका पवित्रा हिरेमठ व शिक्षिका लक्ष्मी कांबळे यांनी हुतात्म्याला आरती करून वंदन केले. मदन बामणे यांनी पुढील वर्षाच्या स्मृतिदिनापूर्वी हुतात्मा बाबू काकेरू यांचा चौकात पुतळा उभारण्याचा संकल्प जाहीर केला.