कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड शहरासंह बामनोली परिसरातही मटका व्यावसायिकांनी चांगलेच बस्तान बसवले आहे. पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून ही बेधडकपणे मटका व्यवसाय सुरु ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बामनोली येथील एका मटका चिट्ठी घेणाऱ्या अड्डयावर छापा टाकून एका एजंटास गजाआड केले. मुद्देमालही जप्त केला. मात्र, मुख्य मटकाबुकी मोकाटच असल्याची चर्चा सुरु आहे. मटका अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी अनेकवेळा कारवाया केल्या, तरीही मटका व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करण्याचे धाडस दाखवले नाही.
बामनोलीतील एका ठिकाणी एजंट मटका घेत असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सांगलीच्या गुन्हे अन्वेषण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणच्या मटका अड्डयावर छापा टाकून एका एजंटास अटक केली. यामध्ये संशयित अमोल मोहनराव पांढरे (३७, रा .चैतन्यनगर, बामणोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडील ७८२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पांढरे विरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.