काहींचा मूड वारंवार बदलतो. एका क्षणी खूप आनंदात असणारी व्यक्ती दुसर्याच क्षणी दुःखी दिसू लागते. तिच्या वागणं प्रत्येक क्षणी बदलत असतं. स्वभाव सतत बदलत असेल तर तुम्हाला बायपोलर डिसऑर्डरची समस्या असू शकते. या आजाराची विभागणी चार विभागांमध्ये करण्यात आली आहे. बायपोलर 1, बायपोलर 2, सायक्लोथायमिक डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डर असे हे चार विभाग होत.
या आजारात मेंदूच्या कार्यावर परिणाम होत असल्यामुळे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो. वागणंबोलणं बदलतं. तसंच जाणीवाही बदलतात. जलद गतीने बोलणं तसंच डोक्यात वेगवेगळे विचार येणं, शारीरिक ऊर्जेत झपाटय़ाने वाढ होणं, निद्रानाश, गरजेपेक्षा अधिक आशावादी असणं, स्वभाव आक्रमक होणं, चिडचिड होणं, मन एकाग्र न होणं, चुकीचे निर्णय घेणं, स्वतःला मर्यादेपलीकडे महत्त्व देणं, नैराश्य, कोणत्याही कामात मन न रमणं ही या आजाराची काही लक्षणं आहेत.
बायपोलर डिसऑर्डर असणारे रुग्ण मद्याच्या तसंच अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. मात्र यामुळे रुग्णाची अवस्था अजूनच बिकट होऊ शकते. मेंदूत स्रवणार्या काही रसायनांच्या असंतुलनामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचं शात्रज्ञांचं म्हणणं आहे. या आजाराचं वेळेत निदान करून उपचार करून घेणं खूप आवश्यक आहे. अनेक रुग्णांना बायपोलर डिसऑर्डर असल्याचं लक्षातच येत नाही आणि परिस्थिती बिकट होत जाते. त्यामुळे बदलता स्वभाव किंवा सतत चिडचिड होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.