भारतीय वंशाच्या कमला हॅरिस होणार उपराष्ट्राध्यक्ष
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जगभराचे लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अंतिमतः डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांनी बाजी मारली आहे. अमेरिकेतील वृत्तसंस्था सीएनएनने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले आहे. बायडन यांना 284 आणि ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल मते मिळाली. बायडन यांना 7 कोटीहून अधिक विक्रमी मते मिळाली आहेत. तर उपराष्ट्राध्यक्षपदी आता कमला हॅरिस यांची निवड निश्चित झाली आहे. तथापि मतमोजणीच्या मुद्यावरुन ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्याने सत्ता संघर्ष आता कोर्टात रंगणार आहे.
जो बायडन यांना नियोजित अध्यक्ष घोषित करण्यात आले असून त्यांनी बराक ओबामा यांच्यासमवेत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून आठ वर्षे काम केले आहे. त्यांच्या या कार्यकालातच अमेरिकेचे भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाले होते.
बायडेन भारताचे समर्थक
बायडन यांनी अनेकदा भारताचे समर्थनही केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख अस्वच्छतेवरुन घाण देश असा उल्लेख केला होता, त्याचाही बायडेन यांनी निषेध करत टिका केली होती. याच दरम्यान त्यांनी भारतासोबतच्या मैत्रीची आम्ही कदर करतो, दहशतवादाविरोधातील लढय़ात अमेरिका कायम भारतासोबत असेल, शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करण्याचीही ग्वाही बायडेन यांनी दिली होती.
दरम्यान, बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाण्याच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे. जो बायडन आणि त्यांच्या सहकाऱयांनी राष्ट्राध्यक्षपद सांभाळण्याची तयारीही सुरू केली आहे. येत्या आठवडय़ात व्हाईट हाऊसच्या वरि÷ अधिकाऱयांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. बायडन यांनी आपल्या संभाव्य कॅबिनेटमध्ये पुरुष, महिला यांच्यासह विविध समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे अभ्यासू लोक असतील, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. त्याला अनुसरून सहकाऱयांनी निवड आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे.
आपल्या जागा 300 पर्यंत पोहोचणार असल्याचा दावा करत संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा असल्याने आपण स्पष्ट बहुमताने विजयी होऊ, असा आशावाद जो बायडन यांनी व्यक्त केला आहे. डेलवेअरमधील विलमिंग्टनमध्ये केलेल्या भाषणात ते बोलत होते. आम्हाला आतापर्यंत 7 कोटी 40 लाखांहून जास्त मते मिळाली आहेत. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बायडन यांच्या विजयाची अजूनही अंतिम घोषणा झालेली नाही. ऍरिझोना आणि जॉर्जियामध्ये गेल्या दोन दशकांपासून रिपब्लिकन पक्षाला अधिक मते मिळत आली आहेत. मात्र, यावेळी या दोन्ही ठिकाणी आपलाच विजय होईल, असेही बायडन म्हणाले. मात्र, संपूर्ण निकाल येण्याआधीच बायडन यांनी स्वतःला विजयी घोषित करू नये, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.