नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 20 हून अधिक भारतीय वंशीय नागरिकांना स्वतःच्या एजेन्सी रिह्यू टीममध्ये सामील केले आहे. यातील 3 भारतीय टीमचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकेत सत्ता हस्तांतरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘आर्ट’मध्ये शेकडो सदस्य असून यात महिलांचे प्रमाण अधिक आहे.
संघीय प्रशासनात ऐतिहासिक स्वरुपात अल्प प्रतिनिधित्व राहिलेल्या समुदायांचे 40 टक्के सदस्य आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे अरुण मजूमदार ऊर्जा विभागात सत्ता हस्तांतरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आर्ट’चे नेतृत्व करणार आहेत. तर राहुल गुप्ता राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरणाच्या पथकाचे नेतृत्व करतील. किरण आहुजा यांना कार्मिक व्यवस्थापनासंबंधीच्या पथकाची धुरा सोपविण्यात आली आहे. पुनीत तलवार यांना विदेश विभागाशी संबंधित पथकात स्थान देण्यात आले आहे. पाव सिंग यांना राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या पथकात समाविष्ट करण्यात आले. अरुण वेंकटरमण यांना वाणिज्य आणि युएसटीआरविषयक पथकांमध्ये सामील करण्यात आले आहे.
प्रवीण राघवन आणि आत्मन त्रिवेदी यांना वाणिज्य विभाग विषयक पथकात, तर शिक्षण विभागात शीतल शाह, ऊर्जा विभागात आर. रमेश आणि रामा जाकिर, अंतर्गत सुरक्षा विभागसंबंधी पथकात शुभश्री रामनाथन, न्याय विभागासाठी राज डे, श्रम विभागासाठी सीमा नंदा आणि राजनायक, फेडरल रिझर्व्ह तसेच बँकिंग आणि भांडवलबाजार नियामक प्रकरणांसाठी रीना अग्रवाल आणि सत्यम खन्ना यांना पथकात स्थान मिळाले आहे. नासासाठी भव्या लाल, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसाठी दिलप्रीत सिद्धू, व्यवस्थापन आणि बजेट कार्यालयासाठी दिव्य कुमारियाह, कृषी विभागासाठी कुमार चंद्रन आणि पोस्ट विभागासाठी अनीष चोप्रा यांना पथकात स्थान मिळाले आहे.