ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने माजी उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन निवडणूक लढवत आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या प्रचाराला पुढील आठवड्यात सुरुवात होणार असून, बायडेन यांच्या प्रचारात माजी अध्यक्ष बराक ओबामा सहभागी होणार आहेत. बायडेन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना बायडेन हे उपाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते आहे. बायडेन यांच्या पुढच्या आठवड्यात होणाऱ्या पहिल्या व्हर्च्युअल निधी संकलनाच्या रॅलीमध्ये ओबामा सहभागी होणार आहेत.अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मे महिन्यात 80.8 दशलक्ष डॉलरचे निधीसंकलन झाले आहे. तसेच सरासरी 30 डॉलरचे ऑनलाईन निधीसंकलन झाले असल्याचे बायडेन यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेवर लढवण्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प 20 जूनला आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत. ट्रम्प सुरुवातीच्या टप्प्यात टेक्सास, फ्लोरिडा, एरिजोना आणि उत्तर कॅरोलिनामधील सभांना संबोधित करणार आहेत.