देश चुकीचा दिशेने वाटचाल करत असल्याची धारणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या लोकप्रियतेत घसरण होत आहे. एप्रिलमधील एनबीसी न्यूजच्या पहिल्या सर्वेक्षणानंतर त्यांचे रेटिंग 10 अंकांनी खालावले आहे. मतदानाच्या 9 महिन्यांनी रेटिंग कमी होत 42 टक्क्यांवर आले आहे. 78 वर्षीय बायडेन यांची अस्वीकृती एप्रिलपासून 15 अंकांनी वाढून 54 टक्क्यांवर पोहोचली आहे. देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे 71 टक्के लोकांचे मानणे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. तर देश योग्य हातांमध्ये असल्याचे 25 टक्क्यांपेक्षा कमी लोकांचे मानणे आहे.
सर्वेक्षणात 75 टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेप्रकरणी बायडेन अयशस्वी ठरल्याचे नमूद केले आहे. पुढील निवडणुकीत मी किती चांगली कामगिरी करणार हे सुनिश्चित करण्यासाठी मी अध्यक्ष झालेलो नसल्याचे बायडेन यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले आहे.
जानेवारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून बायडेन अनेक देशांतर्गत संकटांना तोंड देत आहेत. यात अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याची माघार, दक्षिण सीमेवर स्थलांतरितांची वाढती संख्या, वाढती महागाई तसेच संयुक्त पुरवठा साखळीचे मुद्दे सामील आहेत. देशात पुरवठय़ाचे संकट निर्माण झाले असून किमती वेगाने वाढत आहेत. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दर वाढून 13 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
बायडेन-हॅरिस यांच्यात दुरावा
बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारी महिन्यात दोघांची जोडी 38 वेळा एकत्र दिसून आली होती. ऑक्टोबरमध्ये दोघेही केवळ 8 वेळा एकत्र दिसून आले आहेत. हॅरिस यांनी स्वतःला अध्यक्षांपासून दूर केल्याची चर्चा आहे. स्थलांतरितांचा मुद्दा हॅरिस यांना सोपविण्यात आल्यापासून ही स्थिती ओढवली आहे.