चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पीएसजीवर एकमेव गोलने मात
वृत्तसंस्था/ लिस्बन
किंग्स्ली कोमनने हेडरवर नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर बायर्न म्युनिचने पॅरिस सेंट जर्मेनचा पराभव करून सहावे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या पीएसजीला नेमार, डि मारिया व एम्बापेसारखे स्टार खेळाडू असूनही जेतेपद मिळविण्यात यश आले नाही. त्यामुळे पहिल्या चॅम्पियन्स लीग जेतेपदासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बायर्नने 2013 नंतर प्रथमच अंतिम फेरीत यश मिळविले असून गेल्या नऊ वर्षात नामांकित खेळाडू मिळविण्यासाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम खर्च केलेल्या पीएसजीला युरोपियन चषकापासून यावेळीही वंचितच रहावे लागले. या लढतीत पीएसजीचा नेहमीचा जोम दिसत नव्हता तर बायर्न आश्वासक आणि भक्कम वाटत होते. विशेष म्हणजे या मोसमातील प्रत्येक सामन्यात गोल करणाऱया लेवान्डोवस्कीला गोल नोंदवता आला नसला तरी पीएसजीचा माजी खेळाडू असलेल्या कोमननेच बायर्नचा एकमेव निर्णायक गोल केला. 1998 नंतर अंतिम सामना एकमेव गोलवर निकाली ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जोशुआ किमिचने 59 व्या मिनिटाला पुरविलेल्या क्रॉसवर त्याने बेसावध असलेल्या पीएसजीच्या बचावफळीचा लाभ उठवित हा गोल नोंदवला. बायर्नचा हा या मोसमातील 43 वा गोल होता तर चॅम्पियन्स लीगमधील सलग 11 सामने जिंकणारा तो पहिला संघ बनला आहे. या वर्षीचा मोसम कोरोना महामारीमुळे तीन महिने उशिराने संपला असून बायर्नने त्यात 2013 प्रमाणे तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात युरोपियन कप, बुंदेस्लिगा करंडक आणि जर्मन कप यांचा समावेश आहे. बायर्नने सहावेळा युरोपियन चॅम्पियन असणाऱया लिव्हरपूलशी बरोबरी केली असून एसी मिलान 7 तर रियल माद्रिद 13 वेळा युरोपियन चॅम्पियन बनले आहेत.
बायर्नच्या लेवान्डोवस्कीने या मोसमातील 10 सामन्यात 15 गोल नोंदवले. पण एका मोसमात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा क्रिस्टियानो रोनाल्डोचा 17 गोलांचा विक्रम त्याला मोडता आला नाही. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत बायर्नतर्फे 50 गोल तर एकंदर 68 गोल नोंदवले आहेत. रोनाल्डोने सर्वाधिक 130, मेस्सीने 115, राऊल गोन्झालेझने 71 गोल नोंदवले आहेत. या मोसमातील सर्व स्पर्धांत मिळून लेवान्डोवस्कीने एकूण 55 गोल नोंदवले आहेत.