बुंदेस्लिगा फुटबॉल : बोरुसिया डॉर्टमंडवर एकमेव गोलने विजय
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मन बुंदेस्लिगाचे सलग आठव्यांदा जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच करताना बायर्न म्युनिचने बोरुसियाचा डॉर्टमंडचा एकमेव गोलने पराभव केला. एकमेव विजयी गोल जोशुआ किमिचने नोंदवला.
या स्पर्धेत त्यांचे अजून सहा सामने बाकी असून दुसऱया स्थानावरील डॉर्टमंडवर त्यांनी आता सात गुणांची आघाडी घेतली आहे. मध्यंतरास काही क्षण बाकी असताना किमिचने शानदार गोल नोंदवला. सिग्नल इदुना पार्कवर हा सामना प्रेक्षकाविना खेळविण्यात आला. जेतेपदासाठी बायर्नशी चुरस करण्याची संधी मात्र डॉर्टमंडने घालविली.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोन संघांत लढत झाली तेव्हा बायर्नने 4-0 असा विजय मिळविला होता. डॉर्टमंडचा युवा स्टार स्ट्रायकर एर्लिंग ब्रॉट हालँडने या लीगमध्ये आतापर्यंत 10 गोल नोंदवले आहेत. पण या सामन्यात त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. बायर्नचा भक्कम बचाव त्याला भेदता आला नाही.
आणि उत्तरार्धात त्याला जखमी होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला हालँडला गोल करण्याची संधी मिळाली होती. त्याने मारलेला जोरदार फटका बायर्नचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरच्या पायातून पास झाला होता. पण बोएटेंगने गोललाईनजवळ तो क्लीअर करीत हालँडचा प्रयत्न फोल ठरविला. जेरोम बोएटेंग व डेव्हिड अलाबा यांनी त्याला अजिबात संधी मिळू दिली नाही. सामना संपण्यास 20 मिनिटे असताना हालँड बोएटंगशी टॅकल करताना पडला आणि लंगडतच तो मैदानाबाहेर गेला. कोरोना व्हायरसच्या ब्रेकनंतर सुरू करण्यात आलेल्या या लीगमध्ये आतापर्यंत 19 सामने झाले असून त्यातील 11 सामने पाहुण्या संघाने जिंकले आहेत.
अन्य सामन्यात एन्ट्राच प्रँकफर्टने पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करताना एफसी फ्रीबर्गला 3-3 असे बरोबरीत रोखले. दायची कामादा व थिमोती चँडलर यांनी अखेरच्या टप्प्यात गोल नोंदवल्यामुळे प्रँकफर्टला बरोबरी साधता आली. पदावनतीपेक्षा ते पाच गुण पुढे आहेत. लिव्हरकुसेन येथे झालेल्या सामन्यात व्हीएफएल वुल्फ्सबर्गने बायर लिव्हरकुसेनला 4-1 अशा गोलफरकाने धक्का दिला. दोन गोल नोंदवणारा पोनग्रॅसिक मारिन त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.