वृत्तसंस्था / म्युनिच
बुधवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच संघाने बोरूसिया डॉर्टमंडचा पराभव करून जर्मन सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिकली. 2020 च्या कालावधीतील बायर्न म्युनिचचे हे पाचवे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचने बोरूसिया डॉर्टमंडचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत यजमान बायर्न म्युनिचने दोन गोल नोंदवून आघाडी घेतली होती. बायर्न म्युनिचतर्फे हे पहिले दोन गोल टोलीसो आणि थॉमस मुलेर यांनी केले. बोरूसिया डॉर्टमंडतर्फे ब्रँडेटने आपल्या संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत बायर्न म्युनिचने 2-1 अशी आघाडी मिळविली होती. बोरूसिया डॉर्टमंडला हॅलेंडने बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 8 मिनिटे बाकी असताना किमीचने बायर्न म्युनिचचा तिसरा आणि निर्णायक गोल केला. बायर्न म्युनिच संघाने यापूर्वी सलग आठवेळा बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेतील जेतेपद मिळविले आहे. चालू वर्षांमध्ये बायर्न म्युनिचने बुंदेस्लिगा, जर्मन चषक स्पर्धा, चॅम्पियन्स लीग, युफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत.