बुंदेस्लिगा फुटबॉल : लेवान्डोवस्की, बेंजामिनचा प्रत्येकी एक गोल, अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था/ बर्लिन
कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असतानाही जर्मनीतील बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेतील सामने निर्बंधासहित खेळविण्यात येत असून रविवारी चॅम्पियन बायर्न म्युनिचने युनियन बर्लिनचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. विजयी संघाने दोन्ही सत्रात एकेक गोल नोंदवले. या विजयानंतर त्यांनी गुणतक्त्यात जवळच्या प्रतिस्पर्ध्यावरील चार गुणांची आघाडी कायम राखली आहे.
या लीगमधील सर्वाधिक गोल नोंदवणाऱया रॉबर्ट लेवान्डोवस्कीने 40 व्या मिनिटाला स्पॉट किकवर गोल नोंदवून बायर्नला आघाडीवर नेले. त्यानंतर उत्तरार्धातील 80 व्या मिनिटाला बेंजामिन पाव्हर्डने हेडरवर संघाचा दुसरा गोल नोंदवला. बायर्नने अग्रस्थान कायम राखले असून ते विक्रमी सलग आठव्यांदा लीगचे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. त्यांचे 58 गुण झाले असून दुसऱया स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंडचे 54 गुण झाले आहेत. शनिवारी त्यांनी शॅल्क 04 संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला होता. या मोसमात या लीगमधील अद्याप आठ सामने बाकी आहेत.
‘या सामन्यात आमच्याकडून सर्वोत्तम प्रदर्शन झाले नसले तरी सुरुवातीपासूनच आमचे सामन्यावर वर्चस्व होते,’ असे बायर्नचा कर्णधार मॅन्युएल न्युएर म्हणाला. ‘सामन्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकलो आणि तीन गुण मिळविण्यात यशस्वी ठरलो, याचा आम्हाला आनंद वाटतो. प्रेक्षकाशिवाय खेळविल्या जाणाऱया सामन्यात शेवटची शिटी वाजेपर्यंत प्रत्येक मिनिट हा युगासारखा वाटत राहतो,’ अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या.
कोरोव्हा व्हायरस महामारीमुळे अनेक स्पर्धा तहकूब करण्यात आल्या असून बुंदेस्लिगा ही अशा स्थितीत खेळविली जाणारी जगातील पहिली मोठी लीग आहे. मात्र यातील सामने प्रेक्षकांशिवाय खेळविले जात असून सुरक्षित आरोग्यासाठी संघांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मैदानात मर्यादित स्टाफला प्रवेश आणि नियमित चाचणी करणे, असे निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिसांनी या सामन्यासाठी प्रेक्षकांना न येण्याची सूचना केली होती. तरीही स्टेडियमबाहेर काही डझन चाहते जमले होते. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर ते माघारी गेले होते. जून अखेरपर्यंत ही लीग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रारंभापासूनच बायर्नने सामन्यावर ताबा मिळविला आणि एक संधीही मिळविली. पण पंचांनी खेळाडूला ऑफसाईड ठरविले. प्रशिक्षक अर्स फिशर खासगी कारणासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे युनियन बर्लिन संघ प्रशिक्षकाशिवाय खेळत होता. बायर्नचे नियंत्रण असले तरी पहिल्या गोलसाठी त्यांना 40 व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. लेवान्डोवस्कीने यावेळी पहिले यश मिळवून दिले. त्याचा हा 26 वा गोल असून गर्ड म्युलरचा 1972 चा 40 गोलांचा विक्रम मागे टाकण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे. मॅच प्रॅक्टिसचा अभाव असल्याने उत्तरार्धात खेळ थोडा मंदावल्याचे दिसून आले. मात्र पाव्हर्डने जोशुआ किमिचच्या कॉर्नरवर हेडरद्वारे दुसरा गोल नोंदवून बायर्नचे तीन गुण निश्चित केले.