प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेली सरकारी कर्मचाऱयांची बायोमेट्रिक हजेरी पद्धत 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. गोवा राज्य सरकारने सर्व सरकारी खात्यांना तसे कळवले आहे. बंद असलेल्या बायोमेट्रिक हजेरीचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे आढळल्याने सरकारने तातडीने ती हजेरी पद्धत पुन्हा सुरू करण्याचे ठरविले आहे.
गेले जवळजवळ 6 महिने कोरोना संकटामुळे ती हजेरी पद्धत बंद करण्यात आली होती. कोरोनाचे संकट वाढणार अशी भीती वर्तवण्यात आल्याने ती पद्धत बंद करून सरकारी खात्यांच्या कर्मचाऱयांनी जुनी सही मारण्याची पद्धत सुरू केली होती. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक कर्मचारी उशिरा येणे, लवकर जाणे किंवा मध्येच खात्यातून गायब होणे असे प्रकार वाढू लागल्यामुळे त्याबाबतच्या तक्रारी येऊ लागल्याने बायोमेट्रिक हजेरी पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कोरोनाचे संकट अजून कायम आहे आणि ते संपलेले नाही, तर थोडे कमी झाले आहे. परंतु सरकारी खात्यामधील उपस्थितीवर परिणाम होऊ लागल्याने आणि काहीजण चक्क नंतर येऊन सुट्टय़ा घेऊनही हजेरीपटावर सहय़ा मारू लागल्याने राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने ती हजेरी पद्धत पुन्हा एकदा चालू केली आहे.