चौकशी करुन कारवाईची केली मागणी, पुण्याचे पालकमंत्री अजितदादा, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही दिले निवेदन
प्रतिनिधी/सातारा
सध्या कोरोनाची साथ असताना पुण्यातून बायोमेडिकल वेस्टचे ट्रक साताऱयात आल्याचे प्रकरण गाजत आहे. त्या प्रकरणावरुन पालिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली होती. परंतु सातारा विकास आघाडीकडून नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या सहीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे.
त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपास प्लॅन्ट सोडून सातारा नगरपालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोवरील प्लँटवर दि.13 रोजी डिस्पोजल करण्याकरता पाठवण्यात आले. हे बायोमेडिकल वेस्ट पाठवण्यास कोणी परवानगी दिली?, शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुट्टी असताना नेमके त्याच दिवशी आणि रात्रीच्या वेळी पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक का आले, त्याला आयुक्तांनी परवानगी दिली कशी, लॉकडावूनच्या पाचव्या टप्यात जिल्हाबंदी असताना अत्यावश्यक आणि रितसर पासेस असलेल्या व्यक्ती आणि वाहनांशिवाय अन्य कोणास परवानगी नसताना अशा परिस्थितीत शिरवळवरुन हे ट्रक सातारा जिल्हयाच्या हद्दीत आले कसे, शिरवळ चेक पोस्टवरील संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी कोणती चौकशी करुन हे ट्रक सोडले. बायोमेडिकल वेस्टसारख्या सेन्सीटीव्ह प्रश्नाबाबत पुण्याच्या आणि साताऱयाच्या पालकमंत्र्यांना माहिती देण्यात आली होती का आदी प्रश्न सातारा शहरवासियांच्या मनात निर्माण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो मेडिकल वेस्टचे ट्रक भर वस्तीतून नेण्यात आल्याने सातारकरांच्या मनात अनामिक भीती उत्पन्न झाली आहे. सबब आपणास विनंती की राज्याचे प्रमुख म्हणून आपणास या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावे, तसेसच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा नगरपालिकेच्या सत्तारुढ सातारा विकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे. या बाबीमंधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गांभीर्य लक्षात घेवून तातडीने चौकशी करावी. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत आहोत, असे नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या सह्या आहेत. हे पत्र पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना देण्यात आले आहे.