नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने बायो-बबल प्रणालीवर जहरी टीका केली असून भविष्यात हे बायो-बबल खेळाडूंसाठी दुःस्वप्न ठरेल, असा इशारा दिला आहे. बायो-बबलमुळे क्रिकेटपटूंचे आयुष्य अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया त्याने येथे नोंदवली.
ग्लेन मॅक्सवेलने स्वतः डिप्रेशनमधून मार्ग काढला असून सध्याची स्थिती खेळाडूंसाठी प्रमाणापेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे. ‘बायो-बबलच्या कोंडलेल्या वातावरणात राहिल्यानंतर बाहेरच्या जगाशी मोकळा संवाद साधणेही विसरले जाते आहे. अर्थात, यानंतरही खेळाडू याबद्दल फारशी तक्रार न करता आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. भारतीय खेळपट्टय़ांवर खेळण्याचा उत्तम अनुभव असल्याने ही आपली जमेची बाजू असेल, असे मॅक्सवेलने यावेळी नमूद केले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मॅक्सवेल आरसीबी संघाचे प्रतिनिधीत्व करणार असून यामुळे विराट कोहली व एबी डीव्हिलियर्ससारख्या दिग्गज खेळाडूंसमवेत खेळण्याची संधी मिळत असल्याने त्याने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. वास्तविक, मागील दोन आयपीएल हंगामात मॅक्सवेलची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली आहे. पण, यानंतरही यंदाच्या लिलावात आरसीबीने 14.25 कोटी इतकी भरभक्कम रक्कम मोजत त्याला करारबद्ध करण्याचा जुगार खेळला आहे.