वार्ताहर/ कारदगा
बारवाड येथे दूधगंगा व वेदगंगा नद्यांचा संगम झाला असून या नदी संगमावर बारवाड गावच्या जनतेसाठी फार वर्षापूर्वी घाट बांधण्यात आला आहे. पण आज या घाटाची दयनीय अवस्था झाली असून, ग्रामस्थांना व कपडे धुण्यासाठी जाणाऱया महिला वर्गाला फारच अडचणीचे होत आहे. त्यामुळे या घाटाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
बारवाड गाव हे दूधगंगा, वेदगंगा नदी संगमावर असल्याने ग्रामस्थांसह परिसरातील लोक सोमवार व अमावस्येदिवशी स्नानाला येतात तर महिला वर्ग कपडे धुण्यासाठी येतात. या सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून सुमारे 50 वर्षापूर्वी घाट बांधण्यात आला होता. त्यामुळे या नदीसंगमावर नेहमीच गर्दी असायची. मात्र गेल्या काही वर्षापासून या घाटाची बिकट अवस्था झाली आहे. या घाटाचे बुरुज कोसळून पाण्यात पडले आहेत तर घाटावरील सर्व दगड निघाले आहेत. त्यामुळे या घाटावरून स्नान करण्यासाठी वा कपडे धुण्यासाठी जायचे म्हटले तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. या घाटावर पुरातन महादेव मंदिर असून स्नान झाल्यावर सर्व लोक येथे दर्शन घ्यायचे. पण घाट नादुरुस्त झाल्याने घाटावरील गर्दीच कमी झाली आहे. पाच-सहा वर्षापूर्वी या घाटाशेजारी दुसरा घाट बांधण्यात आला आहे. पण तो घाट निरुपयोगी ठरला आहे. त्यामुळे संबंधितांनी या जुन्या घाटाची दुरुस्ती करुन गैरसोय दूर करावी, अशी अशी मागणी होत आहे.