अवघ्या सहा तासात मुसक्या आवळल्या ; अल्पवयीन मुलासह चौघांचा समावेश
प्रतिनिधी / बारामती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रविराज तावरे उर्फ चिकू पाटील यांच्यावर काल संध्याकाळी सात ते आठच्या वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरील अज्ञात इसमांनी छातीवर गोळ्या झाडून पोबारा केला होता. मात्र बारामती पोलिसांनी सुत्रधारासह हल्लेखोरांना 24 तासांच्या आत ताब्यात घेतले आहे, अशी माहीती पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे सायंकाळी आपल्या ऑडी गाडीतून माळेगांव येथील संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते. त्यांनी वडापाव घेऊन पैसे देऊन ते गाडीकडे निघाले असता अचानक बुलेट गाडीवर तोंड बांधून आलेल्या दोघांनी तावरे यांच्या छातीवर गोळ्या झाडल्या. त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून छातीतून गोळी काढण्यात आली असून ते अद्यापही शुध्दीवर आले नाहीत.
राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यावर गोळीबार झाल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे हलवली. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख लगेच घटनास्थळ दाखल झाले होते. अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक निरीक्षक योगेश लंगुटे, नितीन मोहिते, राहूल जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, नितीन चव्हाण, निखील जाधव यांनी तपासातून सुत्रधारासह चौघांना रातोरात ताब्यात घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राजकीय वादातून गोळीबार
दहाव्या इयत्तेत शिकणाऱया एका अल्पवयीन मुलाने काही दिवसांपुर्वी पिस्तूल खरेदी केले. राजकीय वादातून गोळाबार करण्यात आल्याची माहीती तपासात समोर आले आहे. प्रशांत मोरे याने नियोजन पूर्वीक कट रचला असून यामध्ये राहूल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टाँम मोरे व एक अल्पवयीन अशा चौघांचा समावेश आहे. प्रशांत मोरेला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र बारामती परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.