श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हय़ात गुरुवारी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून जावेद वाणी असे त्याचे नाव आहे. तो मूळचा कुलगाम जिल्हय़ातील रहिवासी असून 20 ऑक्टोबरच्या चकमकीत ठार झालेल्या गुलझार या दहशतवाद्याचा तो सहकारी असल्याचे काश्मीर झोनचे पोलीस इन्स्पेक्टर जनरल विजय कुमार यांनी सांगितले. या कारवाईनंतर घटनास्थळावरून एक पिस्तूल, मॅगझीन, हॅन्डग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
बारामुल्ला जिल्हय़ातील चेरदारी भागात सुरक्षा दलाची गस्तमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक झाल्याची माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या संघर्षात एक दहशतवादी ठार झाला. तसेच सदर भागात अन्य दहशतवादी लपल्याच्या संशयाने दिवसभर शोधमोहीम सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंत अन्य ठिकाणी कोणीही संशयित नजरेस पडला नाही.