राज्यभरातून केवळ 75 विद्यार्थी झाले नापास : सत्तरी, सांगे, काणकोण तालुक्यांचे घवघवीत यश,विज्ञान 99.68, वाणिज्य 99.66, कला 99.39 टक्के
प्रतिनिधी /पणजी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा एकंदर निकाल 99.40 टक्के लागला असून त्यात विज्ञान 99.68 टक्के, वाणिज्य 99.66 टक्के, कला 99.39 टक्के तर व्यवसायिक 98.51 टक्के निकाल लागल्याचे गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भागिरथ शेटये यांनी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेत शेटये यांच्या सोबत सचिव जेराल्डिना मेंडिस, साहाय्यक सचिव शितल कदम व एनालिस्ट तादेव ब्रागांझा उपस्थित होते.
एकूण 18 हजार 195 मुले बारावीला होती. त्यातील 18085 मुले उत्तीर्ण झाली. फक्त 75 मुले नापास झाली. त्यांना परीक्षा देण्याची नव्याने संधी मिळेल. 35 मुलांचा निकाल तांत्रिक कारणामुळे राखीव ठेवण्यात आल्याची माहिती शेटय़े यांनी दिली.
नेहमीप्रमाणे विद्यार्थींनी हुशार
एकूण 9187 मुली परीक्षेला होत्या पैकी 99.74 टक्के म्हणजे 9163 मुली पास झाल्या. 9008 मुलांपैकी 8922 मुलगे पास झाले. हा निकाल 99.05 टक्के ठरला तसेच मागास जमातीतील विद्यार्थ्यांचा 99.6 टक्के, मागास जाती मधील 99.2 टक्के, इतर मागासवर्गीय 99.5 टक्के तर सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांचा 99.3 टक्के निकाल लागल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामीण भागात 100 टक्के
तालुकावार निकाल पाहता सत्तरी, सांगे व काणकोण तालुक्यात 100 टक्के निकाल लागला. पेडणे 99.85, बार्देश 99.31 टक्के, डिचोली 99.6 टक्के, मुरगांव 99.34 टक्के, फोंडा 99.27 टक्के, सासष्टी 99.31 टक्के, तिसवाडी 99.7 टक्के तर केपे तालुक्यात 98.61 टक्के निकाल लागला.
विज्ञानाचा उचांक
विज्ञान शाखेचा निकाल 99.68 टक्के लागला. एकूण 4698 मुलांपैकी 4683 मुले उत्तीर्ण झाली फक्त 5 मुले नापास झाली. गणित विषयात 100 टक्के मुले पास झाली आहेत. वाणिज्य विभाग 99.66 टक्के निकाल लागला. त्यात 5593 विद्यार्थ्यांपैकी 5574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले फक्त 12 मुले नापास झाली. कला विभागात 4745 मुलांपैकी 4716 मुले पास झाली तर 22 मुले नापास झाली. या विभागाचा 99.39 टक्के निकाल लागला. व्यावसायिक शाखेचा 98.51 टक्के निकाल लागला. 3159 विद्यार्थ्यांपैकी 3112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 36 विद्यार्थी नापास झाले.
उर्दू, कोंकणी कठीण
मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांमध्ये सर्वात अधिक म्हणजे 100 पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. या विरुद्ध उर्दूत सर्वात अधिक 92 तर कोंकणी 98 गुण मिळाले आहे. कोकणी विषयात 99.84 टक्के निकाल तर मराठी विभागात 99.87 टक्के निकाल लागला. हिंदीत 99.91, इंग्रजी 99.88, संस्कृत, पोर्तुगिज, पेंच विषयात 100 टक्के निकाल लागला.