पदवीपूर्व शिक्षण खात्याचा आदेश : दिवसाला चार तास घेण्याची महाविद्यालयांना सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
पदवीपूर्व शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्ष 15 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना कॉलेजना दिली आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना यासंबंधीचे आदेशपत्रक पाठविले आहे.
पदवीपूर्वच्या 2021-22 या नव्या शैक्षणिक वर्षाला 15 जूनपासून प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणे सुरू करणे गरजेचे आहे. ऑफलाईन वर्ग भरविण्याविषयी अद्याप निर्णय न झाल्याने सध्या ऑनलाईनद्वारेच शिक्षण द्यावे. मागील वर्षी प्री-रेकॉर्डेड, युटय़ूबद्वारे अभ्यासक्रम शिकविण्यात आला होता. दररोज विद्यार्थ्यांना व्हिडीओची लिंक पाठविण्यात येत होती. ही लिंक प्राध्यापक विद्यार्थ्यांना व्हॉट्सऍप ग्रुपवर पाठवत होते. मात्र, यावेळी संबंधीत कॉलेजची प्राध्यापकांना एम. एस. टीम, गुगल मीट, झूम किंवा जीयो मीटचा वापर करून शिकवावे, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार दिवसातून चार तास घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या हजेरीची नोंद ठेवणे सक्तीचे
दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत पहिला तास, स. 11 ते दुपारी 12 पर्यंत दुसरा तास, दु. 12 ते 12ः30 पर्यंत विश्रांती, दु. 12ः30 ते 1ः30 पर्यंत तिसरा तास आणि दु. 1ः30 ते 2ः30 पर्यंत चौथा तास या वेळापत्रकानुसार ऑनलाईन वर्ग घ्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार लिंक जनरेट करून विद्यार्थ्यांना पाठवावेत. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन याची नोंदवही प्राचार्यांना दररोज द्यावी, असेही सूचविण्यात आले आहे.
अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया स्थगित झाली होती. त्यामुळे तातडीने अभ्यासक्रम शिकविण्यात प्रारंभ करावा. 7 जुलैपासूनच प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी कॉलेजमध्ये हजर होत असल्याने त्यांनी कॉलेजमधून अध्यापन करावे, असेही आदेशपत्रकात नमूद करण्यात आले आहे.