ऑनलाईन टीम / मुंबई :
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी 1 च्या नंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवरुन हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोनाकाळानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचं लसीकरण करुन शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही केले. मात्र, मात्र शासनाने आपाला निर्णय बदलला नाही. परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. उद्यापासून राज्य मंडळाच्या वेबसाईटवर 12 वी ची ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शाळा अथवा कनि÷ महाविद्यालयातूनही हॉलतिकीट उपलब्ध करुन घेता येईल. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी हॉलतिकीट देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. हॉलतिकीट मध्ये विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. तसेच हॉल तिकीट वरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या स्वीकारून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. एखाद्या हॉल तिकीटावर सदोष छायाचित्र असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, अशा सूचना राज्य मंडळाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना केल्या आहेत.