पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
गेली 11 वर्षे आम्ही यशस्वीपणे मुटकोर्टच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात यशस्वी ठरलो आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. यावषीही 11 मार्च ते 13 मार्चपर्यंत मुटकोर्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धारवाड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सुनीलदत्त यादव हे उपस्थित राहणार आहेत. तर 13 मार्च रोजी सांगता समारंभाला उच्च न्यायालयाच्या धारवड खंडपीठाचे न्यायाधीश के. एस. हेमलेखा उपस्थित राहणार असल्याची माहिती आरएलएस लॉ कॉलेजचे गर्व्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ऍड. आर. एस. मुतालिक-देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुटकोर्ट स्पर्धेमध्ये 25 संघ भाग घेणार आहेत. 9 वेगवेगळय़ा राज्यातून हे संघ येणार आहेत. प्रत्येक संघामध्ये तीन स्पर्धक राहणार आहेत. विजेत्या संघाला 30 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर रनर्सअपला 20 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. बेस्ट मेमोरियल, बेस्ट स्पीकर (विद्यार्थी, विद्यार्थिनी) यांना प्रत्येक 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. तर बेस्ट मुटरला 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
मुटकोर्ट स्पर्धेला कर्नाटक लॉ सोसायटीचे चेअरमन ऍड. पी. एस. सावकार हे देखील उपस्थित राहणार आहेत. बारावे एम. के. नंबियार राष्ट्रीय मुटकोर्ट पद्मविभूषण ऍटर्नी जनरल ऑफ इंडिया के. के. वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनातून सुरू आहे, असेही ऍड. आर. एस. मुतालिक-देसाई यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य ए. एच. हवालदार, समन्वयक अश्विनी परब या उपस्थित होत्या.