प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत येथील नगरपालिकेने बारा डबरेतील कचऱयाचे ढिग हटवून सुंदर स्वच्छता उद्यानाची निर्मिती केली आहे. या उद्यानात हिरवाई आता बहरली असून लहान मुले, नागरिक, महिला या उद्यानात फिरण्यासाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत या जागेचे रूपडे पूर्णपणे पालटण्यात पालिकेला यश आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या घनकचरा व्यवस्थापन आराखडय़ातील निधीतून बारा डबरे येथील कचरा डेपो हटवून येथे अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि स्वच्छता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. ओला व सुका कचऱयावरील प्रक्रियेसाठी दोन शेड तसेच वेस्ट टू वेल्थ या धोरणांतर्गत प्लास्टीकपासून विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी तिसऱया शेडची निर्मिती करण्यात आली आहे. शेडच्या परिसरात भव्य उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. याच ठिकाणी कराड झीरो किलोमीटर हा सेल्फी पॉईंटही साकारला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. उद्यानात कारंजा, पाथ वे, रंगीबेरंगी फुलझाडे, लॉन, नागरिकांना बसण्यासाठी बाकडी ठेवलेली आहेत. या उद्यानात लावलेली झाडे, फुलझाडे आता बहरली आहेत. याशिवाय लॉनही चांगले आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाचा परिसर रमणीय झाला आहे. या उद्यानामुळे शहरात आणखी एका उद्यानाची भर पडली आहे. काही वर्षांपूर्वी कचऱयाचे ढिग, दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा वावर यामुळे या ठिकाणी जाण्यासही लोक घाबरत होते. आता या परिसराचे रूपडे पालटण्यात पालिकेस यश आले असून लहान मुले, नागरिक, महिला या उद्यानात फिरण्यासाठी जात आहेत. उद्यान आणि कचरा प्रकल्पातील कामांच्या पूर्ततेनंतर याचे उद्घाटन होणार आहे.