वृत्तसंस्था/ मियामी
येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड ऍश्ले बार्टी आणि कॅनडाची बियान्का अँड्रेस्क्यू यांच्यात महिला एकेरीच्या जेतेपदासाठी पहिल्यांदाच अंतिम लढत होत आहे.
ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड महिला टेनिसपटू बार्टी हिने गेल्या वर्षी कोरोना महामारी समस्येमुळे आपले वास्तव्य स्वगृही केले होते. 2020 च्या फेब्रुवारीनंतर बार्टीने पहिल्यांदाच विदेशातील टेनिस स्पर्धेत पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला. बार्टी ही या स्पर्धेतील माजी विजेती आहे. कॅनडाच्या अँड्रेस्क्यूने दुखापतीनंतर आपले टेनिस क्षेत्रातील पुनरागमन या मियामी स्पर्धेत केले आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात बार्टीने स्वीटोलिनाचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. 20 वर्षीय अँड्रेस्क्यूने उपांत्य लढतीत ग्रीकच्या सॅकेरीवर 7-6 (7-5), 3-6, 7-6 (7-4) अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी बार्टी आणि अँड्रस्क्यू यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.