वृत्तसंस्था/ माद्रिद
जागतिक तृतीय मानांकित सिमोना हॅलेपचे माद्रिद ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सने तिला पराभूत केले. तर ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी व पॉला बॅडोसा यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. क्विटोव्हा, बेलिंडा बेन्सिक यांचे आव्हान मात्र समाप्त झाले.
स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकला पॉला बॅडोसाने 6-4. 7-5 असे हरवून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले तर बार्टीने पेत्र क्विटोव्हावर 6-1. 3-6, 6-3 अशी मात केली. उपांत्य फेरीत बार्टी व बॅडोसा यांच्यात लढत होणार आहे. त्याआधी रोमानियाच्या हॅलेपने ही स्पर्धा 2016 व 2017 मध्ये जिंकली होती. पण या मोसमात तिला अद्याप एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मर्टेन्सने तिला 4-6, 7-5, 7-5 असे हरवित उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मर्टेन्सची पुढील लढत तिची दुहेरीची जोडीदार एरीना साबालेन्काशी होणार आहे. साबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 6-1, 6-2 असा केवळ 52 मिनिटात धुव्वा उडविला. कॅरोलिना मुचोव्हाने मारिया साकेरीचा 6-0, 6-7 (9-11), 7-5. रशियाच्या पॅव्हल्युचेन्कोव्हाने जेनिफर ब्रॅडीचा 7-5, 6-7 (8-10), 6-3 असा पराभव करून आगेकूच केली.