भाजप उमेदवार जोशुआ, रोहन, दयानंद यांचे प्रतिपादन : श्री देव बोडगेश्वराचे घेतले आशीर्वाद
प्रतिनिधी /म्हापसा
बार्देशसाठी टुगेदर असे काही नाही तर राज्यात भाजपसाठी आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. पक्ष सोडून पक्षात फूट घालून टुगेदर फॉर बार्देश म्हणणे योग्य नाही. लोकांचे मत, विचार महत्त्वाचे आहे. बार्देशातील सातही मतदारसंघात पक्ष संघटीत करण्यासाठी आम्ही पुढे येणार आहोत. बार्देश काबिज करणे आमचे ध्येय असून ते आम्ही साध्य करणार असल्याचे प्रतिपादन पर्वरीचे माजी आमदार रोहन खंवटे, शिवोलीचे दयानंद मांद्रेकर व म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा येथे बोलताना केले. श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जोशुआ डिसोझा यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी सर्वजण म्हापसा बोडगेश्वर मंदिराकडे जमले होते. जोशुआनी नारळ देव बोडगेश्वरासमोर ठेवून प्रचाराचा शुभारंभ केला.
गेल्या वेळच्या तुलनेत अधिक मते घेणार : जोशुआ डिसोझा
जोशुआ डिसोझा म्हणाले की, आमची एक फेरी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होणार हे निश्चित आहे. विरोधक नाहक आरोप करीत असून अडीच वर्षात बरीचशी कामे केली असून काही सुरु आहेत. निवडणुकीनंतर ती पूर्ण होतील. आगामी निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा अधिक मते देऊन म्हापसावासिय आपल्याला विजयी करणार असल्याचे ते म्हणाले.
म्हापशा जोशुआंचा विजय निश्चित : दयानंद मांद्रेकर
शिवोलीचे उमेदवार दयानंद मांद्रेकर म्हणाले की, स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी पाचवेळा व पोटनिवडणून मिळून जोशुआ यांनी सहाव्यांदा विजय मिळविला आहे. याच्या पुढेही जोशुआच निवडून येणार. आमच्याकडून सर्व सहकार्य त्यांना मिळणार आहे. विरोधकांच्या अप्रचाराला कोणी बळू पडू नका, पक्षाशी प्रामाणिक राहाण्याचे आवाहन मांद्रेकर यांनी केले.
सुधीर जेव्हा जोशुआना आशीर्वाद देतात
देव बोडगेश्वर मंदिरात जोशुआनी देवदर्शन घेतल्यानंतर बाहेर आले तेथे परस्पर विरोधक उमेदवार सुधीर कांदोळकर होते. जोशुआनी त्यांना हात दिला असता सुधीर यांनीही हातवर करुन त्यांना आशीर्वाद दिला. काहीनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्येही टिपला. दिवसभर म्हापशात हा एक चर्चेचा विषय बनून राहिला.