समितीच्या निवडीसाठी बैठक : प्रगती संकुल हिशोबाच्या मान्यतेवरून वाद
प्रतिनिधी / पणजी
बार्देश तालुका भंडारी समाजाची निवडणूक घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली rसमाजाच्या केंद्रीय समितीची बैठक बार्देश तालक्याच्या प्रगती संकुलाच्या हिशोबाच्या मुद्यावरून वादळी ठरली. प्रगती संकुलाच्या हिशोबाला मान्यता दिल्याशिवाय नवीन समितीची निवड होऊ देणार नाही, असा इशार समाजबांधवानी दिला. यावरून समाजबांधवांमध्ये धक्काबुक्कीही झाली. अखेर हा हिशाब केंद्रीय समितीला मान्य असल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्यात आला.
या बैठकीला व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, दिलीप पालयेकर, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, किरण कांदोळकर, उपाध्यक्ष देवानंद नाईक, महिला अध्यक्ष शुभांगी वायंगणकर, बार्देश तालुक्याचे अध्यक्ष सुधीर कांदोळकर आदी समाजबांधव उपस्थित होते. समाजाचे संकुल उभारताना व्यासपीठ व लिफ्ट याबाबत केंद्रीय समितीने प्रश्न उपस्थित केले होते. सभागृहाचे काम पूर्ण झाल्यावर श्री. कांदोळकर यांना देण्यात आलेले पॉवर ऑफ अटर्नी काढून घेण्यात आली. काहीही श्री. कांदोळकर यांच्यावर हिशोबात घोळ केल्याचा आरोप केला होता. लिफ्ट न बसविता त्याचे 14 लाख रूपये हिशोबात दाखविले, 25 लाखांची स्टेज उभारली असे अनेक आरोप करण्यात आले. समाजाच्या केंद्रीय समितीने या हिशोबाला मान्याता देण्यास नकार दिल्याने दोन दिवसांपूर्वी बार्देश अस्थायी समितीने पत्रकार घेऊन केंद्रीय समिती हिशोबाबत विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. हिशोबाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत बैठक होऊ दिली जाणार नसल्याचा इशाराही दिला होता.
सुधीर कांदोळकर आणि त्यांच्या टीमने प्रगती संकुल उभारून समाजासाठी चांगले कार्य केले आहे. आजच्या बैठकीला सातही मतदारसंघातील समाजबांधव उपस्थित आहे. समितीवर जे निवडून येतील ते आपल्यातील असतील. नवी समिती अन्य काही विकास कामे करणार आहे, असे किरण कांदोळकर म्हणाले. या प्रगती संकुल उभारणीसाठी सुधीर कांदोळकर सदैव झटले आहे. त्यांनी चांगले काम करून आपल्या समाजासाठी चांगली वास्तू उभी केली, असे दिलीप परूळेकर म्हणाले.
दीड कोटी खर्च करून या संकुलासाठीचे गटारबांधकाम करण्यात आले आहे. गोव्यात भंडारी समाज मोठय़ा संख्येत आहे. असे असूनही आपला समाज पुढे जात नाही. बार्देश समितीची निवड करण्यासाठी दोन वर्षे जातात ही वेदनादायक गोष्ट आहे, असे सांगून आज या समितीची निवड होत असल्याबाबत, असे श्री. मांद्रेकर यांनी समाधान व्यक्त केले. हे सभागृह उभारण्यासाठी काही जणांचा नकार होता मात्र अनेकांनी या कामासाठी देणग्या दिल्या त्यांची नावे येथे लिहायला हवी, असे आमदार साळगावकर म्हणाले.
अनिल होबळे यांनी समाजावर केस घातली. त्यांनतर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे बार्देश तालुका समितीची निवड करण्यास उशीर झाल्याची माहिती अशोक नाईक यांनी दिली. सर्वांच्या सहकार्याने व आर्थिक पाठबळावर म्हापसा प्रगती संकुल उभारण्यात आले. या कामात आपण स्वार्थ पाहिला नाही. बार्देशसाठी मोठे सभागृह उभारला. 14 लाखांचा स्टेज बांधला. सभागृह उभारल्यावर आपल्याला दिलेली पॉवर ऑफ अटर्नी केंद्रीय समितीने काढून घेतली. आपल्यावर काहीही आरोप केले. मात्र आपण सर्व हिशोब सादर केला आहे. केंद्रीय समिती तो मान्य करायला तयार नाही, असा आरोप सुधीर कांदोळकर यांनी यावेळी केला.
पोलिसांच्या उपस्थितीने वातावरण झाले तंग
समाजाची बैठक सुरू असतानाच उपनिरीक्षक आशिष परब पोलीस फौजफाटय़ासह सभागृहात दाखल झाले. पोलिसांना सभागृहात कोणी बोलावले असा प्रश्न उपस्थित करत समाजबांधवांनी अध्यक्ष अशोक नाईक यांना धारेवर धरले. यावेळी काहीकाळ वातावरण तंग झाले. यानंतर पदाधिकाऱयांनी पोलिसांना बाहेर जाण्यास सांगितले.
समाजबांधवांमध्ये धक्काबुक्की, आरोप-प्रत्यारोप
सरचिटणीस फक्रू पणजीकर यांनी, तालुका समिती नेमावी अशी घोषणा केला. यानंतर आस्थायी समितीचे अध्यक्ष उल्हास आस्नोडकर व सुधीर कांदोळकर यांच्या समर्थकांनी आक्षेप घेत प्रथम तालुका समितीने सादर केलेल्या प्रगती संकुलाच्या हिशोबाला मान्याता द्या, अशी मागणी केली. काहीनी तर पणजीकर यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला यावेळी बाचाबाचीही झाली.
अध्यक्षपदासाठी तीन नावे
बार्देश तालुका अध्यक्षपदासाठी प्रभाकर मांद्रेकर, किशोर अस्नोडकर व नारायण मांद्रेकर या तिघांची नावे पुढे आली असून इतर पदासाठीही नावे देण्यात आली आहे. ही नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली असून अंतिम यादीवर केंद्रीय समिती शिक्कामोर्त करणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी आमदार पालयेकर यांनाही मार्गदर्शन केले. अजित बकाल यांनी या सभागृहाला स्व. सोमा वेंगुर्लेकर यांचे नाव देण्याची मागणी केली. सुरुवातीला उपाध्यक्ष नाईक यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन श्री. पणजीकर यांनी केले तर आभार सुनिल नाईक यांनी केले.