प्रतिनिधी / बार्शी
तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ ने वाढून २० पर्यंत पोहचली. शहरातील सोलापूर रोड येथील महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे, तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या एकूण २० झाली आहे. त्यानंतर, रात्री उशीरा सोलापूर रोडवरील राजन मिल परिसर प्रशासनाकडून प्रतिबंधित करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यात आजपर्यंत १९ रुग्ण पॉझिटिव्ह होते. त्यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या एक होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी दैनिक जनसत्यने खासगी रुग्णालयातील क्वारंटाईन रुग्णांचे वृत्त दिले होते. या क्वारंटाईन रुग्णांपैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून ती महिला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शहरातील सोलापूर रोड येथील महिलेचा स्वब पॉझिटिव्ह आला असून संबंधित महिला रुग्णालयात सफाई कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या महिलेच्या अहवालासह तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० वर पोहचली आहे. त्यामुळे, शहरात नियमावली कडक करण्याची आवश्यक्यता आहे. यापूर्वी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 5 होती ती आता 6 वर पोहचली आहे. दरम्यान, आज प्राप्त १३ अहवालांपैकी १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, अद्याप ५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह महिलांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शहरातील वाढत्या गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. तर, नागरिकांनीही स्वतःहुन खबरदारी घ्यायला हवी.