प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील धोत्रे या गावी असणाऱ्या श्रीराम विद्यालय या ठिकाणी कार्यरत सहशिक्षक बालाजी भोसले यांनी आपल्या कुटुंबासह आज पासून बार्शी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह करत आमरण उपोषण चालू केले आहे. बालाजी भोसले या शिक्षकांस या शाळेने 2013 साली आपल्या सेवेत घेतल्यानंतर 2018 साली अनुदान प्राप्त झाल्यावर त्यांना अचानक काढून टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सहशिक्षक बालाजी भोसले यांच्यासह त्यांचे वडील अंकुश भोसले व त्यांच कुटुंब या सत्याग्रहात सामील झाले आहे तर या सत्याग्रहास पहिल्या दिवशी महात्मा फुले समता परिषद, बार्शी शहर काँग्रेस सावता परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर, शिक्षण अधिकारी सोलापूर यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालाजी भोसले हे भगवान बाबा शिक्षण प्रसारक व संशोधन मंडळ या संस्थेच्या धोत्रे या गावातील श्री राम विद्यालय या ठिकाणी 2013 पासून कार्यरत आहेत त्यांची नियुक्ती ओबीसी प्रवर्ग यातून झाली असून त्यांना शासनाने नियमानुसार नियुक्ती व मान्यता दिली आहे. तसेच 2018 साली या शिक्षण संस्थेला अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्यांचा पगार शासनाने शाळेच्या खात्यावर ती वर्ग केला आहे.
मात्र येथील शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक संजय जाधवर यांनी त्यांना 2018साली अनुदान प्राप्त झाल्यानंतर अचानक शाळेत येऊ नका असे सांगितले सर त्यांच्याजागी संस्थापक अध्यक्ष संजय जाधवर यांची भावजई श्रीमती पद्मावती माणिकराव कोकाटे यांची बेकायदेशीर नियुक्ती केली आहे. अनुदान प्राप्तीनंतर बिंदुनामावलीनुसार आरक्षण पूर्ण असल्याशिवाय अनुदान मिळत नाही तरीही अनुदान प्राप्त झाल्यावर संजय जाधव यांनी स्वहस्ताक्षरात शाईने खाडाखोड करून शिक्षकांची यादीमध्ये आपल्या भाऊजई यांचे नाव घातले असल्याचे निवेदनात सांगितले आहे. तर शिक्षण खात्याचे वेतन पथक यांनी याबाबत दुर्लक्ष केले असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. यावेळी बालाजी भोसले यांनी सहकुटुंब चालू केलेल्या आंदोलन सत्याग्रहावेळी अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.