प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुका पोलीस स्टेशन सध्या सोमवार पेठ येथील शाहीर अमर शेख चौकात आहे. या ठिकाणी तालुका पोलीस ठाणेस जागा अपुरी पडत असल्याने हे पोलीस ठाणे बार्शी बायपास रोडवर कंदलगाव नजीक खाजगी जागेत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या स्थलांतर प्रक्रियेला बार्शी माजी आमदार व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी विरोध केला आहे. तसे निवेदन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार दिलीप सोपल यांनी पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की सध्या बार्शी तालुका पोलीस ठाणे हे सोमवार पेठ येथील शाहीर अमर शेख चौकात असून हे पोलीस ठाणे सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने ग्रामीण भागातील अनेक गावकऱ्यांना व नागरिकांना या पोलीस ठाण्याचा फायदा होत आहे. तर जागा अपुरी पडत असल्याने हे पोलीस ठाणे मोठ्या जागेत स्थलांतरित होणे गरजेचे असल्याने, सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने याविषयी प्रक्रिया चालू केली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे हे बार्शीच्या बाहेर बार्शी बायपास रोड कांदलगाव या खाजगी जागेमध्ये हलविण्याची प्रक्रिया चालू आहे.
जर हे पोलीस ठाणे बायपास रोडवरती हलविले तर अनेक नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बार्शी तालुक्यातील अनेक गावे पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेमध्ये असल्याने गावकऱ्यांच्या दृष्टीने हे पोलीस ठाणे जाण्या-येण्यासाठी अतिशय गैरसोयीचे होणार आहे. तर हेच तालुका पोलीस ठाणे बार्शीतील डॉक्टर आंबेडकर शॉपिंग सेंटर जवाहर हॉस्पिटल किंवा इतर बार्शी शहराच्या मध्यवर्ती भागातील मोकळ्या इमारतीमध्ये हलविण्यात यावे अशीही मागणी सोपल यांनी निवेदनातून केली आहे.