तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
बार्शी तालुक्यातील अनेक बंधारे पहिल्या पावसात वाहून जात असल्याचे दिसून येत असताना आता एक वर्षापूर्वी बार्शी – तुळजापूर रोड वरील शेलगाव (मा) या गावानजीक असणाऱ्या ओढ्यावरील बंधारा 1 वर्षापूर्वी नवीन बांधलेला असतानाच वाहून गेला असल्याचे उघड झाले आहे. तर हा बंधारा गेल्यावर्षी पावसाळ्यात वाहून गेला असून या बंधाऱ्याची साईड वेअर पूर्णपणे पडले असून आता या बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने बार्शी तालुक्यामध्ये पावसाचे पाणी जिरवावे या उद्देशाने प्रत्येक छोट्या-मोठ्या ओढ्यावर्ती बंधारे बांधणेचे काम प्रगतीपथाने केले होते. मात्र वेळोवेळी ही कामे निकृष्ट दर्जाची किंवा नियमानुसार न झाल्याचे उघड होत आहे. बार्शी तालुक्यातील बंधारे हे पहिल्या पावसात वाहून जात आहेत मुळात हे बंधारे बांधत असताना त्याठिकाणी पडणार पाऊस किंवा वाहणारे पाणी याचा अंदाज घेऊन त्या बंधाऱ्याचे इस्टिमेट ठरवले जाते. कशाप्रकारे बंधारा बांधायचा आणि त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची साहित्य जसे की सिमेंट, वाळू ,स्टील ,खडी चे प्रमाण ठरवलेले असते आणि त्याप्रमाणे काम होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी कामे निकृष्ट दर्जाची होतात. त्याचप्रमाणे बार्शी तुळजापूर रोड वरील शेलगाव हद्दीतील ओढ्यावर बंधारे बांधले आहेत. त्यापैकी बारंगुळे यांच्या शेता नजीक असणारा बंधारा 1 वर्षापूर्वी पावसाच्या पाण्याने वाहून गेला असल्याचे दिसत आहे.
या बंधाऱ्याच्या बाजूला असणारी साईड म्हणजेच सिमेंट मी बांधलेली मोठी भिंत वाहून गेली असून जी मुख्य बंधाऱ्याची भिंत आहे त्यासही तडे गेले असून बंधारा धोकादायक बनला आहे. आता सध्या ठेकेदार मार्फत या बंधाऱ्यांची दुरुस्ती चालू असून ठेकेदार हा बंधारा स्वखर्चाने दुरुस्त करीत असल्याची माहिती बार्शी लघुपाटबंधारे विभागाने दिली आहे. मात्र हा बंधारा बांधताना आणि दुरुस्त करीत असताना तो नियमाप्रमाणे होत आहे की नाही ही हे पाहणे आद्य कर्तव्य असताना त्यावेळी योग्य पाहणी किंवा निरीक्षण झाले नसल्याने असा कुचकामी बंधारा बांधला गेला आहे.
याबाबत बार्शी लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मच्छिंद्र सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हा बंधारा गेल्यावर्षी बांधला असून गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये बंधाऱ्याची साईडची बाजू वाहून गेली आहे आहे तसेच तेथे जमिनीला धर नाही. परंतु संबंधित ठेकेदारास ही दुरुस्ती करण्यास सांगितले असून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे.