बार्शी/प्रतिनिधी
बार्शी तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार बाबत अनेक धाडी टाकल्या जात आहेत. त्यात काल दिनांक 12 ऑगस्ट च्या रात्री वैराग पोलिसांनी बार्शी शहर पोलीस यांच्या सहकार्याने बार्शी बाजार समितीतील व्यापारी रामलिंग किलचे यांच्या गोडाऊन वर धाड टाकून सुमारे सहाशे नव्वद कट्टे रेशनचे धान्य जप्त केले आहे. यात 510 कट्टे तांदूळ असून 110 कट्टे गव्हाचे आहेत. सर्व माल सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असून रेशन मार्फत नागरिकांना देण्याचे धान्य आहे. पोलिसांचा त्रास होतो म्हणून बार्शी बाजार समिती बंद ठेवण्याच्या पहिल्या दिवशी पोलिसांना हे धन्य सापडले आहे. याप्रकरणी अजून अनेक व्यापारी यांची नावे पुढे आली असून ती गोपनीय ठेवण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर धाड टाकण्याचा तयारी पोलिसांनी चालू केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, काही दिवसापूर्वी वैराग येथील सतीश खेनदाड यांच्या दुकानावर धाड टाकून वैराग पोलिसांनी दोन लाख 63 हजार रुपये किमतीचा रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी साठवण्यात आलेले होते ते जप्त केले आहे. सतीश खेनदाड यांना याबाबत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी चालू असताना त्यांनी सांगितले प्रमाणे बार्शी येथील व्यापारी किलचे यांचेकडून त्यांनी माल विकत घेतला होता. त्यामुळे वैराग पोलिसांनी बार्शी पोलिसांच्या सहकार्याने बार्शी बाजार समितीमधील कीलचे यांच्या गोडाऊन वरती धाड टाकून 690 कट्टे एवढे धान्य जप्त केले आहे. ही कारवाई बार्शी पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, वैराग पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, यांनी बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या सहकार्याने केले यावेळी बार्शी तहसीलचे पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे आणि बार्शी बाजार समितीचे सचिव अशोक जगदाळे हेही उपस्थित होते.