युरोपियन सुपर लीग स्पर्धेतून माघार घेणार नसल्याचा स्पष्ट पवित्रा
माद्रिद / वृत्तसंस्था
युरोपियन सुपर लीगमधील उर्वरित 3 बंडखोर बार्सिलोना, माद्रिद व युवेन्टस यांनी आपला बंडखोरीचा पवित्रा कायम ठेवला असून यापुढे हे तिन्ही क्लब व युफा यांच्यात अधिक संघर्ष रंगणार, असे चित्र आहे. तीन आठवडय़ांपूर्वी युरोपियन सुपर लीगच्या वादग्रस्त संकल्पनेत 12 क्लबनी आपला सहभाग दर्शवला होता. पण, युफाने सक्त कारवाईचा इशारा दिल्यानंतर 9 क्लबनी आपण या संकल्पनेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित 3 क्लब मात्र अद्याप आपल्या बंडखोरीच्या पवित्र्यावर ठाम असल्याचे शनिवारी नव्याने अधोरेखित झाले.
‘आमचे मित्र आणि सुपर लीग प्रोजेक्टमधील सहकारी युफाच्या कारवाईला घाबरत मागे हटले आहेत, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे. पण, आम्ही स्वतः युफाची कारवाईची धमकी आणि त्यांचा कडक पवित्रा, या बाबींना फारशी भीक घालत नाही’, असे बार्सिलोना, युवेन्टस व माद्रिद यांनी एका संयुक्त पत्रकातून यावेळी नमूद केले.
या तिन्ही क्लबनी आपला बंडखोरीचा पवित्रा मागे घेतला नाही तर त्यांच्यावर चॅम्पियन्स लीगमधून निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे सध्याचे संकेत आहेत. युफाने सध्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील दर्शवला आहे.
सुपर लीग प्रोजेक्टअंतर्गत अर्सेनल, चेल्सी, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी व टॉटनहम या इंग्लिश क्लब्जनी आपण सहभागी होण्याची तयारी दर्शवली. मात्र, चाहते व ब्रिटीश प्रशासनाने रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या 48 तासातच त्यांनी याप्रकरणी घुमजावही केले होते. प्रीमियर लीग क्लब ऍटलेटिको माद्रिद, एसी मिलान व इंटर मिलान या क्लबनी देखील युफाशी समझोता करत आपण फक्त सध्या अस्तित्वात असलेल्या युरोपियन स्पर्धामध्ये सहभागी होत असल्याची लेखी हमी दिली.
काय आहे युरोपियन सुपर लीग प्रोजेक्ट?
15 कायमस्वरुपी व 5 निमंत्रित असे 20 क्लबनी एकत्रित येऊन युरोपियन सुपर लीग प्रोजेक्टचा घाट घातला असून त्यातील 12 क्लबना संस्थापक क्लब म्हणून ओळखले जाणे अपेक्षित होते. मात्र, ही संकल्पना जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसात चाहत्यांनी व ब्रिटीश प्रशासनाने याला तीव्र विरोध दर्शवला व हा कल पाहत 12 पैकी 9 क्लबनी माघार घेतली. यापैकी, अर्सेनल व लिव्हरपूल या क्लबनी तर चाहत्यांची जाहीर माफीही मागितली. युरोपियन सुपर लीग प्रोजेक्टच्या आयोजकांनी प्रारंभी पीएसजी, बायर्न व बोरुसिया डॉर्टमंड या क्लबशी देखील संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी त्याचवेळी यात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दर्शवला.
12 फाऊंडर क्लबची रचना
प्रीमियर लीगचे 6 संघ ः अर्सेनल, चेल्सी, लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, टॉटनहम.
ला लिगामधील 3 संघ ः रियल माद्रिद, बार्सिलोना, ऍटलेटिको माद्रिद.
सिरी ए मधील 3 संघ ः इंटर, युवेन्टस, एसी मिलान.