प्रतिनिधी/ मडगाव
कुंकळीपासून काही अंतरावर असलेल्या बार्से येथील एका लहान पुलावर मंगळवारी झालेल्या एका अपघातात मासेवाहू दोन कंटेनरची बरीच हानी झाली तर कंटेनरमधील एका कर्मचाऱयाला किरकोळ दुखापत झाली.
प्राप्त माहितीनुसार रिप्रेजरेटरची सोय असलेले दोन कंटेनर रत्नागिरीहून मडगावात आले होते. या दोन्ही कंटेनरमध्ये रत्नागिरीहून आणलेली मासळी होती. हे दोन्ही कंटेनर मडगावच्या दिशेहून काणकोणच्या दिशेने जात होते. दोन्ही कंटेनर बेफाम वेगाने जात होते. कुंकळीच्या पुढे बार्से गाव लागतो. याच गावातून मडगाव- काणकोण महामार्ग जातो.
दोन्ही कंटेनर या महामार्गावरुन जात असताना बार्से येथील एका लहान पुलावर पुढे जात असलेला कंटेनर काही क्षणासाठी सावकाश झाला आणि इतक्यात पाठीमागून येत असलेलया कंटेनरने पुढच्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की मागून येणाऱया कंटेनरची बरीच हानी झाली तसेच मागील कंटेनरवर असलेला क्लीनर किरकोळ जखमी झाला.
योगायोग असा की त्याचवेळी काणकोणहून मडगावच्या दिशने जोरात येणारी व कर्नाटकात नोंदणी केलेली एक प्रवासी बस तेथे पोहाचली. मात्र चालकाने प्रसंगावधान पाहून बस नियंत्रणात ठेवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता अशी सुत्रानी माहिती दिली.