नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बालकांच्या लैंगिक शोषण प्रकणी सीबीआयने येथे 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे दोन-तीन राज्यांमध्ये पसरलेली आहेत. ओडीशात ते काही दिवसांपूर्वी प्रथम उघडकीस आले होते. बालकांचे लैंगिक शोषण करुन त्याचे व्हिडीओ चित्रण करुन ते सोशल मिडियावर प्रसारित करणाऱयांचे रॅकेट काही दिवसांपूर्वी सीबीआयने उद्धवस्त केले होते. त्या संदर्भात हे अटकसत्र झाले.
या प्रकरणातील आरोपी राम गौतम, सतेंदर मित्तल आणि पुरुषोत्तम यांना दिल्लीत अटक करण्यात आली. तर अन्य काही आरोपींना झांशी, तिरुपती, आणि नोयडा येथून अटक करण्यात आली. चौकशी पुढे जाईल तशी आणखी अनेक जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटचा सुगावा लागताच सीबीआयने व्यापक मोहीम हाती घेऊन आरोपींना पडकले होते. गुप्तचरांनी आणि सायरबर गुन्हे विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ही मोहीम हाती घेण्यात आली.
सीबीआयच्या मोहीमेअंतर्गत 50 सोशल मिडीया गटांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. या गटांमध्ये 5 हजारांहून अधिक लोक आहेत. त्यांपैकी अनेकजण पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, बांगलादेश, नायजेरिया, इंडोनेशिया, अझरबैजान, श्रीलंका, अमेरिका, येमेन, इजिप्त, ब्रिटन, बेल्जियम आणि घाना या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. सीबीआयने या देशांशी संपर्क साधला आहे.
गेली तीन वर्षे हे रॅकेट बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हीडीओ तयार करुन ते सोशल मिडियावर प्रसारित करण्याचे बेकायदेशीर कृत्य करीत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. अनेक बालके या शोषणाला बळी पडली आहेत. या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास सीबीआय अधिकाऱयांनी व्यक्त केला असून जाळे रचण्यात आले आहे.