वार्ताहर/ कराड, कोयना वसाहत
येणके (ता. कराड) येथे 15 नोव्हेंबर रोजी बिबटय़ाच्या हल्ल्यात चार वर्षीय ऊसतोड मजुराचा मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून वन विभागाने बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर शनिवारी 13 व्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास बिबटय़ा सापळ्यात सापडल्याने वनविभागासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वैद्यकीय तपासणीत हा बिबटय़ा मादी जातीचा असून अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा असल्याचे पुढे आले आहे. हा बिबटय़ा पूर्ण तंदुरूस्त आहे. वनविभागाच्या वतीने जुन्नरच्या माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात त्याची रवानगी करण्यात आली. दरम्यान, बिबटय़ा सापडल्याची माहिती मिळताच बिबटय़ाला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
कराड दक्षिण बिबटय़ाप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील येणके, पोतले, तांबवे, किरपे, येरवळे, कोळे, घारेवाडी परिसरातील नागरिकांना वारंवार बिबटय़ाचे दर्शन होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री-अपरात्री शेतात जाताना लोक घाबरत आहेत. या परिसरात बिबटय़ाकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटनाही मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ वारंवार करीत होते.
दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आईसोबत शेतात निघालेल्या चार वर्षीय आकाश या ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबटय़ाने हल्ला केला होता. आकाशची मान जबडय़ात धरून आईसमोरच बिबटय़ाने उसाच्या शेतात फरफटत नेले होते. या घटनेत आकाशचा जागेवरच मृत्यू झाला होता. या भयानक घटनेने संतापलेल्या नागरिकांनी बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
वन विभागाने तत्काळ उपाययोजना राबवत बिबटय़ाला पकडण्यासाठी शिवारात ठिकठिकाणी सात पिंजरे ठेवले होते. शोधमोहीमही राबवली होती. यामध्ये वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र पहारा देत गस्त घालत होते. वनविभागाने येणके परिसरात मुक्काम ठोकला होता. वन विभागाने लावलेल्या कॅमेऱयात बिबटय़ा कैद झाला होता. बिबटय़ा पिंजऱयाच्या परिसरातून वावरत होता. मात्र पिंजऱयात येत नव्हता. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास कृष्णत गरुड यांच्या शेतातून बिबटय़ाचा आवाज शेजारील वस्तीवरील लोकांना आला. वनविभागाचे कर्मचारीही या ठिकाणी पहारा देण्यास येत असताना बिबटय़ा पिंजऱयात कैद झाल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष वाहन व साधनसामुग्रीसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी उपवनक्षेत्रपाल महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले उपस्थित होते. वनसंरक्षक शंकर राठोड, संतोष यादव, उत्तम पांढरे, सुभाष गुरव, अश्विन पाटील, पूजा खंडागळे, भारत खटावकर, शीतल पाटील, रमेश जाधवर, दीपाली अवघडे, सविता कुट्टे, आंनदा सवाखंडे, ए. एम. जाधव तसेच वनपाल डी. डी. जाधव, बाबुराव कदम, सहायक अरुण शिबे, मयूर जाधव, वैभव शेवाळे, हणमंत कोळी, रोहित कुलकर्णी, हनमा मिठारी या सर्वांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी चोवीस तास सेवा बजावली.
जुन्नरच्या बिबट निवारण केंद्रात रवानगी
बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी वन विभागाच्या वतीने बिबटय़ाला वन विभागाच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. यानंतर बिबटय़ाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वनक्षेत्रपाल तुषर नवले व वनकर्मचारी सहय़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या खास वाहनातून बिबटय़ाला घेऊन जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवरण केंद्राकडे रवाना झाले.
शोधमोहीम सुरुच राहणार
शनिवारी एक बिबटय़ा सापडल्यानंतर पुन्हा काही ग्रामस्थांना बिबटय़ा दिसल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे वन विभागाच्या वतीने लावलेले पिंजरे आहे तसेच ठेवण्यात आले आहेत. तर शोधमोहीमही सुरुच ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी शेतात जाताना दोघे तिघे मिळून जावे. जाताना बोलत अथवा मोबाईलवर गाणे लावून जावे. हातात घुंगरू लावलेली काठी घेऊन आवाज करीत जावे. जेणेकरून आसपास बिबटय़ा असेल तर आवाजाने घाबरून तिथून निघून जाईल, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुलावर हल्ला करणारा बिबटय़ा हाच का?
पिंजऱयात कैद झालेल्या बिबटय़ानेच चार वर्षीय मुलावर हल्ला केल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शिवारात आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्याने त्या मुलावर हल्ला करणारा बिबटय़ा हाच आहे का असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.