किरण ठाकुर यांचे प्रशंसोद्गार ‘अनट्रप्ड’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
खेळण्या बागडण्याच्या, मौजमस्ती करण्याच्या कोवळ्या वयात श्लोक याने स्वतःमधील साहित्यिक प्रगल्भता दर्शवित चक्क पुस्तकाची निर्मिती करणे हे आजच्या मुलांसाठी खरोखरच प्रेरणादायी कार्य आहे, असे प्रशंसोद्गार दैनिक तरुण भारतचे समुह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी काढले.
श्लोक पै काणे याने लिहिलेल्या ’अनट्रप्ड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गोमंतकीय इतिहास आणि अन्य विषयांवरील अनेक कथांचा या पुस्तकात समावेश आहे. कांपाल येथील सूर्यकिरण हॅरिटेज हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यास अनेक मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते. श्लोक हा आपल्या बहिणीचा नातू असून कुटुंबाची साहित्यिक परंपरा तो पुढे नेत असल्याबद्दल अभिमान वाटत आहे, असे किरण ठाकुर यांनी पुढे सांगितले. विद्यार्थीदशेतील आपले विविध छंद जोपासतानाच श्लोक यांना स्वतःमधील साहित्यिक प्रगल्भतेलाही वाव दिला. डिजिटल उपकरणांमुळे आज मुलांमधील वाचनाची आवड फारच कमी होत चालली असतानाच श्लोक सारखी मुले त्याला अपवाद ठरतात. म्हणुनच श्लोकमधील वेगळेपणा आज दिसून आला आहे. अभ्यास आणि फुटबॉल सारख्या खेळाची आवड सांभाळतानाच त्याने स्वतःमधील लेखकालाही कागदावर उतरविले. त्यातून एका आदर्श अशा पुस्तकाची निर्मिती झाली, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्याला सुयश चिंतिताना भविष्यात जास्तीत जास्त साहित्यनिर्मिती त्याच्या हातातून घडत राहो, अशा शुभेच्छाही दिल्या.
लेखक श्लोक याने मनोगत व्यक्त करताना स्वतःची साहित्यिक आवड, पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा या सर्वांचा आढावा घेतला. सदर पुस्तकाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या अनेकांचा यावेळी गौरव करण्यात आला. अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सुनिता यांनी सुत्रसंचालन केले.