वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला फुटबॉल संघातील स्ट्रायकर बाला देवीची 2020-21 या मोसमासाठी एआयएफएफने वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू तर युवा खेळाडू मनीषा कल्याणची सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड केली आहे.
बाला देवीला तिसऱयांदा हा पुरस्कार मिळाला असून याआधी 2014 व 2015 असे सलग दोन वर्षे तिने हा पुरस्कार मिळविला होता. बाला देवी सध्या स्कॉटलंडमधील रेंजर्स एफसी संघातून खेळत असून गेल्या फेब्रुवारीमध्ये तिने या संघात पदार्पण केले आणि डिसेंबरमध्ये या संघासाठी पहिला गोल नोंदवून इतिहास घडविला. युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉलसाठी करारबद्ध करण्यात आलेली भारताची ती पहिली महिला फुटबॉलपटू आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना 31 वर्षीय बाला देवीने रेंजर्स एफसी, राष्ट्रीय संघाचे तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ती खेळलेय, त्या सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले. याशिवाय तिला आजवर पाठिंबा दिलेल्या कुटुंबियांचे तसेच संघसहकाऱयांचेही तिने आभार मानले आहेत.
19 वर्षीय मनीषा ही देखील आघाडीवीर असून तिला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने आणखी कठोर मेहनत घेऊन ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळत राहील, अशा भावना तिने व्यक्त केल्या. ‘ज्यांच्यामुळे मी इथवर मजल मारू शकले आणि ज्यांनी मला सक्षम बनविले, त्या राष्ट्रीय संघाच्या सर्व स्टाफ सदस्यांचे मी मनापासून आभार मानते. याशिवाय संघसहकाऱयांच्या पाठिंब्यामुळेच मी हा पुरस्कार मिळवू शकले, त्या सर्वांची मी कृतज्ञ आहे. कुटुंबीय, प्रशिक्षक, गुरू या सर्वांचीही मी आभारी आहे,’ असे ती म्हणाली.
यू-17 व यू-19 संघांतून खेळलेल्या मनीषाने 2019 मध्ये हाँगकाँगविरुद्धच्या लढतीतून वरिष्ठ संघात पदार्पण केले आणि तेव्हापासून तिच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. 2019-20 मधील इंडियन वुमेन्स लीगमध्ये तिला स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. विजेत्या ठरलेल्या गोकुळम केरळा एफसी संघातून खेळताना तिने त्यावेळी मोलाचे योगदान दिले होते.
या दोन्ही खेळाडूंची निवड महिला संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका मॅमोल रॉकी यांनी एआयएफएफचे हंगामी तांत्रिक संचालक सावियो मेदीरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर केली आहे. एआयएफएफचा सर्वोत्तम रेफरीचा पुरस्कार तेजस नागवेकर तर सर्वोत्तम साहायक रेफरीचा पुरस्कार सुमंता दत्ता यांना मिळाला आहे. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.