फिरोज मुलाणी/ पुणे
तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या खुल्या महाराष्ट्र केसरी गटातील लढतीना शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा ड्रॉ सर्वच तगडय़ा मल्लांना सोपा पडल्याने गादी गटात अभिजित कटके, सागर बिराजदार, बालारफिक, मारुती जाधव, सिकंदर शेख यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. सोलापूरने सुवर्णपदकाची कमाई आजही कायम ठेवली. आज दोन सुवर्णासह पदक तक्त्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूरला पुन्हा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर सातारने कास्यपदकाने खाते उघडले आहे.
63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची प्रथम फेरी देखील पार पडली. यामध्ये गादी विभागाच्या विशेष लक्षवेधी लढतींमध्ये लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेवर 19 सेकंदात विजय मिळविला. तर पुण्याच्या अभिजीत कटके याने अमरावतीच्या मिरजा नदीम बेग याच्यावर 6 सेकंदात चीतपट विजय मिळवत पुढील फेरी गाठली. याबरोबरच मुंबईच्या समाधान पाटील याने हिंगोलीच्या दादुमिया मिलानी वर 7 विरुद्ध 2 या गुण फरकाने विजय मिळविला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिह्याच्या साहिल पाटीवर 11 विरुद्ध 6 या गुण फरकाने विजय मिळविला.
माती विभागात गत विजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर 10-0 असा तांत्रिक गुणधीक्मयाने विजय मिळविला. तसेच वाशिमच्या सिकंदर शेखने तांत्रिक गुणधीक्मयाने विजय मिळविला. तर संकेत घाडगे (पिंपरी चिंचवड), सागर मोहलकर (अहमदनगर), संतोष लवाटे (कोल्हापूर जिल्हा), उमेश सिरतोडे (वर्धा), शुभम जाधव (यवतमाळ), व तृणाल वाट यांनी पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
61 किलो गटात पुण्याच्या सागर मारकडला गोल्ड
61 किलो गटातील माती विभागात पुणे जिल्हयाच्या सागर मारकडने व पुणे शहराचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या निखिल कदमवर चीतपटीने मात करीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. सागर हा मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. 61 किलो गटातील माती विभागात सागर मारकडने औरंगाबादच्या सौरभ राऊतला उपांत्य फेरीत चितपट विजय मिळविला व अंतिम फेरीत धडक मारली. तर पुणे शहराच्या निखिल कदमने सोलापूरच्या हनुमंत शिंदेवर 2-1 ने मात करीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर सागर मारकड व निखिल कदम यांच्यात झालेल्या लढतीत सागर मारकड सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. याबरोबरच कांस्य पदकासाठी हणूमंत शिंदे (सोलापूर जिल्हा) व सौरभ राऊत (औरंगाबाद शहर) यांमध्ये लढत झाली व हनुमंत शिंदे हे 12-3 ने विजेते ठरले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस दलाच्या सहआयुक्त स्मिता पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र बाळासाहेब लांडगे, अमोल बुचडे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे आदि उपस्थित होते.
गादी विभागातील 57 किलो गटात जोतिबा आटकळेची बाजी
गादी विभागातील 57 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवलेवर विजय मिळवत सुवर्ण पदक पटकाविले, तर पुणे शहरातील संकेत ठाकुर याने कांस्य पदकाच्या झालेल्या लढतीत कोल्हापूर शहराच्या साईराज चौगुले याचा 10-0 आशा गुणाधिक्याने पराभूत केले.
गादी विभागातील 79 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने उस्मानाबादच्या रविंद्र खैरे याचा 14-3 गुणाधिक्याने पराभव करून सुवर्ण पदकावर आपली मोहोर उमटवली. याच वजनी गटातील कांस्य पदकाच्या लढतीत सातारच्या श्रीधर मुळीक याने लातूरच्या विष्णु तनपुरे वरती 7 विरुद्ध 2 गुण फरकाने विजय मिळवत कांस्य पदक पटकावले.
सोलापूरचे आबासाहेब व जोतिबा बंधू सुवर्णपदकाचे मानकरी
शुक्रवारी सलामीला 57 किलो मातीगटात आबासाहेब आटकळे याने सुवर्णपदक मिळवले होते. आज सकाळी गादी गटात त्याचाच सख्खा भाऊ जोतिबा आटकळे याने 57 किलो गादीगटात सुवर्णपदक मिळवले. 57 किलो गटात दोन्ही भावांनी मिळवलेल्या सुवर्णपदकाची आज मैदानात चर्चा होती.
रणवाद्यांने कुस्तीगिरांना प्रोत्साहन शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या मातीतिल खेळात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही मातीशी नाळ जोडून असणाऱया रणवाद्याने खेळाची रंगत वाढत आहे. कोल्हापूरचे संजय मनोहर आवळे यांच्या हलगी पथकाने नवी जान भरली आहे. आवळे यांच्या कुटुंबाचाच हा व्यवसाय असूनते स्वतः वयाच्या 7 व्या-8व्या वर्षापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हलगी वादन करत आहेत. दोन हलगी वादक, दोन घुमके, एक झांज व एक तुतारी असे हे पथक आहे.