सी आणि डी वॉर्डमध्ये पाणीबाणी
कोल्हापूर प्रतिनिधी
बालिंगा उपसा केंद्रातील ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे शुक्रवारी शहरातील ‘सी’ आणि ‘डी’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. सकाळ सत्रामध्ये नागरिकांची पाण्यासाठी धावपळ झाली. रात्री उशीरा येथील कामकाज झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती जल अभियंता अजय साळोखे आणि उपजल अभियंता जयेश जाधव यांनी दिली.
बालिंगा उपसा केंद्रातून निम्म्या शहरातील पाणीपुरवठा होतो. शुक्रवारी सकाळी येथील ट्रन्सफॉर्मरमध्ये बिघाड होवून एच टी बुशींगमध्ये गळती लागली. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱयांनी गळती रोखण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश आले नसल्याने स्टँड बाय असणारा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे निर्णय घेतले. रात्री उशीरा हे काम पूर्ण झाले. या दरम्यान, एक उपसा पंप बंद ठेवावा लागल्याने सी आणि डी वॉर्डमधील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. येथील पुरवठा रात्री उशीरा सुरू झाला.