वनखात्याचा गव्याला सातेरी डोंगरावर घालवण्याचा प्रयत्न
वाकरे/प्रतिनिधी
कोल्हापूर गगनबावडा राज्य रस्त्यावर बालिंगे स्मशानभूमी नजीक गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गव्याने दर्शन दिले. येथील ग्रामस्थ व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गव्याला सातेरी डोंगराच्या दिशेने घालवण्याचा प्रयत्न केला.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की, वडणगे, भुये, कसबा बावडा या परिसरात धुमाकूळ घालणारा गवा गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बालिंगे स्मशानभूमीच्या रस्त्यालगत नागरिकांना दिसून आला. याची माहिती त्वरित वनखात्याला देण्यात आली. वन खात्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर झाले. यावेळी त्यांनी या गव्याला पाडळी खुर्द च्या दिशेने सातेरी डोंगराकडे घालवण्याचा प्रयत्न केला. मात्र गवा बालिंगे, पाडळी खुर्द परिसरात घुटमळत असल्याचे दिसत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना गवा हुलकावणी देत असल्याने या कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे.