क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
टी.एफ.ई. सोसायटीच्या टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयातील बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा संकुलाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. बालिका आदर्श विद्यालयाच्या सौ. संगीता देसाई सभागृहामध्ये या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
टी. एफ. ई. सोसायटीच्या व्हाईस चेअरमन रोहिणी गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास बॉक्सिंग आणि कुस्ती रिंगचे पुरस्कर्ते स्टफ इंडिया (जर्मन कंपनी), पुण्याचे सीईओ बी. पी. चिरमुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते ज्ये÷ बॉक्सिंगपटू मुकुंद किल्लेकर आणि कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व एम. आय. गोलीहळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी शाळेचे शिक्षक विश्वास गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्रा. आनंद गाडगीळ यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे बिपिन चिरमुरे यांच्या हस्ते फित कापून बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात चिरमुरे यांनी, सध्या पुण्याला राहत असलो तरी आपण मूळचे बेळगावचे असल्याचे स्पष्ट केले. बेळगावचा असल्यामुळे या शहरासाठी काहीतरी करायची माझी इच्छा होती, त्यातूनच या बॉक्सिंग व कुस्ती क्रीडा संकुलासाठी आपण मदत केली आहे. भविष्यात बेळगाव येथील क्रीडापटूंनी बॉक्सिंग आणि कुस्ती क्रीडा प्रकारात स्वतःचे आणि आपल्या शहराचे नांव उज्वल करावे. बालिका आदर्शसह बेळगावातील फक्त शालेय मुलींसाठी हे बॉक्सिंग व कुस्ती क्रीडा संकुल खुले राहील. याचा उदयोन्मुख क्रीडापटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास टी.एफ.ई. सोसायटीचे संचालक, सभासद, शाळेतील शिक्षक, प्रा. माधुरी शानभाग, लता कित्तुर, विश्वास पवार, अनंत सोमण्णाचे आदीसह शाळेतील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. शिक्षक विजय पार्लेकर यांनी आभार मानले.